तक्रारीनंतर अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर छापेमारी! संगमनेरच्या उत्पादन शुल्क अधिकार्यांची बदली करा; दारूबंदी आंदोलनाची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्तांनी घेऊन नाशिक उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेले पथक दोन दिवस अकोल्यात पाठवले. या पथकाने अकोले, राजूर, कोतूळ येथील अवैध दारूविक्रीवर धाडी घातल्या. यापुढेही हे पथक सतत तालुक्यावर लक्ष ठेवून असेल व तक्रारींची दखल घेणार असल्याचे पथकातील अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, धडक कारवाईने अवैध दारूविक्रेत्यांत एकच खळबळ उडाली.

लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांतील सदस्यांना रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुष महिलांकडून पैसे हिसकावून घेत मारहाण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबांसाठी आवश्यक आहे, असे पत्र दारूबंदी आंदोलनाचे हेरंब कुलकर्णी यांनी गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्तांना लिहिले होते. या पत्राची दखल घेत अकोल्यातील मॉडर्न हायस्कूल जवळील दारूच्या दुकानाबाहेर विक्री करताना पथकाने कारवाई केली. तसेच राजूर येथील अवैध विक्री करणार्यावर गुन्हा दाखल केला. या पथकातील एका अधिकार्याने राजूर, कोतूळ येथे दारू विक्रेत्यांना सावध केल्याने कारवाईवर परिणाम झाला असल्याचे पुराव्यानिशी दारूबंदी आंदोलनाच्या सदस्यांनी उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले. यामुळे आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादन शुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येथील अधिकार्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलन कार्यकर्त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे इतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदीपुलाजवळ चोरून विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीतही खुलेआम दारू विकली जात आहे. एकीकडे शोकाकूल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणार्या या विक्रेत्यांना नूतन पोलीस निरीक्षकांनी पायबंद घालावा. याचबरोबर अकोले व राजूरमध्ये गेल्या 5 वर्षांतील झालेल्या कारवाया एकत्र करून त्याआधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचा परवाना रद्द करावा व राजूरमध्ये तडीपारी करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा अॅड.रंजना गवांदे, हेरंब कुलकर्णी, नीलेश तळेकर, संतोष मुर्तडक, संदीप दराडे, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके, डॉ.भाऊराव उघडे यांनी केली आहे.
