केलवडमध्ये लाळ्या-खूरकुतसह घटसर्पने गायी दगावण्याचा सिलसिला सुरूच पशुवैद्यकांचे प्रयत्नही ठरताहेत असफल; मोठे नुकसान होत असल्याने गोपालक हैराण

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील केलवड येथे लाळ्या-खूरकुत व घटसर्प आजाराने गायी दगावण्याचा सिलसिला अजुनही सुरू आहे. खासगी व सरकारी पशुवैद्यकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुनही गायी दगावत असल्याने गोपालक हैराण झाले आहेत.

केलवड येथे लाळ्या-खूरकुत तसेच घटसर्पाचे थैमान महिन्यापासून सुरु आहे. केलवड सारख्या भागात शेतकर्यांची उपजीविका दूध व्यवसायावर आहे. शेती पावसावर आवलंबून असल्याने एखादे पीक त्यांना मिळते. मात्र उन्हाळ्यात त्यांना पिण्याच्या पाण्याची पंचायत असते. अशा स्थितीत केलवडकर आपल्या गोठ्यातील गायी सांभाळून उपजीविका करतात. मात्र यावर्षी आजाराच्या संकटामुळे गोपालक हैराण झाले आहेत. कालपर्यंत केलवडमध्ये 23 गायी, 20 लहान वासरे तर 8 शेळ्या या आजाराने दगावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

लसीकरण न केल्याचा आरोप करत शेतकर्यांनी ही कैफियत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना धारेवर धरले होते. विखे पाटील यांच्या आदेशाने वैद्यकीय यंत्रणा जागी होऊन लाळ्या-खूरकुत तसेच घटसर्प या आजाराचे प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. घटसर्पचे 1800 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण करण्यात आल्यानंतरही गायी दगावण्याचा सिलसिला सुरू असल्याने याबाबत लोणी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिघे म्हणाले, केलवड भागातील जनावरांना घटसर्पची लागण झाली होती, म्हणून त्यांचे लसीकरण करण्यात आले. रक्ताचे नमुने पुण्याला लॅबमध्ये तपासले. घटसर्पाचे निदान झाले. सर्व जनावरांना पशुवैद्यकीय यंत्रणेने लसीकरण केले. घटसर्पाची प्रतिकार क्षमता निर्माण होण्यास 15 दिवस ते तीन आठवडे लागतात, कदाचित महिनाही लागू शकतो. घटसर्प बरोबरच काविळ, गोचिड तापाचेही निदान झाले. हा आजार लवकरच आटोक्यात येईल. दरम्यान, कालही केलवडला एका शेतकर्याची कालवड दगावली. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने पुन्हा जोरदार मोहीम राबवून शेतकर्यांच्या जनावरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
