अखेर भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले! संततधार कायम; तीन दिवसांत पन्नास हजारांहून अधिक पर्यटक पाणलोटात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर नगरजिल्ह्यात बहुप्रतीक्षित असलेले भंडारदरा धरण आज (ता.16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्याद्वारे 9 हजार 72 क्यूसेक, व्हॉल्वद्वारे 329 क्सूसेक व विद्युत गृहाद्वारे 818 क्यूसेक असा एकूण 10 हजार 219 क्यूसेकचा विसर्ग सोडला असून धरण पूर्ण भरल्याने आवक होत असलेल्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कमी-अधिक केला जाणार आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे भरते आले आहे. मुळा खोर्‍यातील पावसाचा जोरही पुन्हा वाढल्याने मुळा धरणाचा पाणीसाठाही सकाळी 96 टक्क्यांवर पोहोचला असून धरणातून 6 हजार क्यूसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे पाणलोट क्षेत्राला स्वर्गीय सौंदर्य प्राप्त झाले असून गेल्या तीन दिवसांत भंडारदरा परिसरात 50 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राजूर पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होवूनही या कालावधीत कोणतीही अप्रिय घटना समोर आलेली नाही.

काहीशा विलंबाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. मागील महिनाभरात सतत कोसळणार्‍या पावसाने भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं भरण्याची स्थितीही निर्माण केली होती. मात्र मुसळधार पाऊस सुरु असतांना धरणांचे पाणीसाठे पूर्ण क्षमतेकडे नेल्यास त्यातून धरणासह लाभक्षेत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने धरण व्यवस्थापनाने परिचलन सूचीचा प्रभावी वापर केला. त्यामुळे अनियमितपणे कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर प्रवरा नदीपात्रातून 14 हजार क्यूसेकपर्यंत पाणी वाहूनही कोठूनही पुराच्या पाण्याने नुकसान झाल्याचे अद्यापपर्यंत वृत्त नाही.

गेल्या आठवड्यापासून पाणलोटातील पावसाचा झंझावात कमी झाला आहे, मात्र संततधार कायम असल्याने क्षमता गाठण्याची स्थिती असतांनाही भंडारदर्‍याचा पाणीसाठा तांत्रिक पातळीवर (95 टक्के) तर निळवंड्याचा पाणीसाठा 85 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान ठेवला गेला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत पाणलोटात अनेकदा तुफान पाऊस होवूनही लाभक्षेत्रात गंभीर स्थिती निर्माण होईल इतके पाणी सोडण्याची वेळ आली नाही. मात्र आता संततधार कायम असली तरीही पावसाचा जोर निम्म्याहून अधिक कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी 6 वाजता गेल्या 24 तासांत धरणांत दाखल झालेल्या 713 दशलक्ष घनफूट पाण्यातील 255 दशलक्ष घनफूट पाणी रोखून भंडारदर्‍याचा एकूण पाणीसाठा 98.82 टक्क्यांवर नेण्यात आला, तर दुपारी 12 वाजेपर्यंतच्या सहा तासांतच धरणात 130 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने भंडारदर्‍याची पाणीपातळी 215.70 फूटांवर नेवून धरण पूर्ण भरल्याची घोषणा शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी केली.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा मात्र अद्यापही 85 ते 90 टक्क्यांदरम्यान हलता ठेवण्यात आला असून मागील 24 तासांत धरणात दाखल झालेल्या 713 दशलक्ष घनफूट पाण्यासह धरणाच्या साठ्यातील 32 दशलक्ष घनफूट अशा एकूण 745 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. सध्या धरणातून 16 हजार 718 क्यूसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले जात असून प्रवरानदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यातच आता भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने यापुढील कालावधीत प्रवरा नदीला मोठा पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मुळा धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर टिकून असून ओढ्या-नाल्यांना आवेश चढल्याने कोतुळनजीकच्या मुळा पात्राचा फुगवटा 9 हजार 541 क्यूसेकवर पोहोचल्याने धरणाचा पाणीसाठा 95.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातून मुळा नदीच्या पात्रात 6 हजार क्यूसेक तर कालव्यांद्वारे 120 क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सलग सुट्ट्या असल्याने या कालावधीत भंडारदर्‍यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या सहकार्‍यांनी या कालावधीत योग्य बंदोबस्ताची आखणी करीत भंडारदर्‍याकडे जाणारी आणि येणारी वाहतूक एकेरी केल्याने व या कालावधीत पाणलोटात दाखल होणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करुन मद्य जप्तीची मोहीम राबविल्याने तीन दिवसांत 50 हजारांहून अधिक पर्यटक आणि त्यांच्या शेकडों वाहनांचा वावर होवूनही या परिसरातून एकाही अप्रिय घटनेची वार्ता समोर आलेली नाही.


दरवर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. यावर्षी गेल्या तीन दिवसांत 50 हजारांहून अधिक पर्यटकांनी या भागाला भेट दिली. गर्दीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भंडारदर्‍याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या रस्त्यांवर एकेरी वाहतुकीसह ठिकठिकाणी तपासणी नाके तयार करुन प्रत्येक पर्यटकाच्या वाहनाची कसून तपासणी करुन काही पर्यटकांनी सोबत आणलेल्या मद्याच्या बाटल्या जप्त करुन त्यांच्या समोरच त्या ओतून दिल्या. त्याचा परिणाम प्रचंड गर्दी आणि वाहनांची वर्दळ असूनही कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. या कालावधीत आम्ही 60 हजारांहून अधिक रुपयांच्या मद्याची विल्हेवाटही लावली आहे.
नरेंद्र साबळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक – राजूर

Visits: 148 Today: 1 Total: 1112532

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *