खोकरमध्ये माजी सरपंचाच्या घरावर दरोडा; तीस तोळे सोने व दीड लाखांची रोकड चोरली शेजारील शेतकर्‍याचेही साडेदहा हजार लुटले; तालुका पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खोकर येथील खंडोबा मंदिराजवळील माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर दरोडेखोरांनी गुरुवारी (ता.17) पहाटे दोन वाजेच्या सुमारास दरोडा टाकत 30 तोळे सोने, 1 लाख 45 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. सुदैवाने मारहाण केली नाही. तत्पूर्वी अज्ञात दरोडेखोरांनी एका शेतकर्‍याच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटाची उचकापाचक करून 10 हजार 400 रुपयांवर डल्ला मारला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खोकर गावातील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असलेले माजी सरपंच लक्ष्मण किसन चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबियांसह घरामध्ये झोपलेले होते. तर मुलगा लोकेश हा शेजारच्या खोलीत झोपलेला असताना गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मुख्य दरवाजाच्या बाहेरची कडी लावून उत्तरेकडील दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करत सोन्याचे दागिने व रोख 1 लाख 45 हजारांची रक्कम चोरली. तसेच याच खोलीलगत असलेल्या बाथरूमवजा खोलीतील बंदूक दरोडेखोरांनी घराच्या बाहेर आणून लगतच्या झाडात टाकून दिली.

दागिन्यांमध्ये 6 तोळे सोन्याच्या 4 बांगड्या, 4 तोळ्यांचे मंगळसूत्र, साडेतीन तोळ्याचा हार, सहा तोळे वजन असलेल्या अकरा सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे दोन जोड कर्णफुलं, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन साखळ्या, अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मणी, दोन तोळे वजनाचे नाकातील नथ व सर आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी घरी आणून ठेवलेले रोख एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड असा सुमारे आठ लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले आहे. तसेच पळविलेल्या सुटकेसमधील एका बँकेचे पासबुक, चेकबुक व न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रेही लंपास केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


दरम्यान, सकाळी हा प्रकार चव्हाण यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाणे गाठले. परंतु ठाणे अंमलदारांनी साडेआठ वाजेपर्यंत तिष्ठत ठेवले. यावेळी पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर होते. दोन तासांनंतर लोकप्रतिनिधींशी संपर्क केल्यानंतर सूत्रे हलली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना माहिती समजताच स्वतःच्या वाहनाने घटनास्थळी दाखल होत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहमदनगर येथून श्वान पथक व हस्तरेषा तज्ज्ञ पथक बोलावून तपासाची चक्रे फिरविली. श्वान पथकाने चव्हाण यांच्या वस्तीपासून अर्धा किलोमीटर कारेगाव रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. याचबरोबर येथून जवळच असेलेले रवींद्र कुसेकर यांच्या कपाटातील 10 हजार 400 रुपये दरोडेखोरांनी चोरले.

श्वान पथकात पोलीस हवालदार वीरकर व खाडे यांचा तर हस्तरेखा तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मदने व पोहेकॉ. जयराम जंगले यांचा सहभाग होता. याप्रकरणी तालुका पोलिसांनी माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद क्रमांक 179/2021, भादंवि कलम 457, 380 प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहे.

Visits: 131 Today: 1 Total: 1849608

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *