कोविडमध्येही संगमनेरात वाहतोय दारुचा पूर! संगमनेर शहर पोलिसांची पाच ठिकाणी कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात दररोज उच्चांकी रुग्ण समोर येत असल्याने एकीकडे भीतीदायक वातावरण असताना दुसरीकडे बेकायदा उद्योग करणार्यांचे मात्र चांगलेच फावले आहे. तालुक्यात औषधांचा तुटवडा जाणवत असला तरीही अंमली पदार्थांची कोठेही कमतरता नसल्याचे चित्र दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आपल्या हद्दीतील पाच ठिकाणी छापे घालून गावठी, देशी आणि विदेशी दारु बेकायदा पद्धतीने विकणार्यांचा भांडेफोड केला आहे. या कारवाईत राजापूरमधील हातभट्टीही उध्वस्त करण्यात आली असून या सर्व कारवायांतून पोलिसांनी 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सर्व कारवायांमधून केवळ एक आरोपी हाती लागला असून उर्वरीत पाच आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुर्या ठेवल्या आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर शिवारातील म्हाळुंगी नदीपात्रात बाभळीच्या आडोशाला राजू पिंपळे हा इसम हातभट्टी लावून गावठी दारु तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा घातला असता पोलिसांना पाहून आरोपी पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याच्या हातभट्टीवर छापा घालीत 8 हजार 100 रुपयांची 30 लिटर तयार गावठी दारु आणि शंभर लिटर रसायन जप्त केले. याप्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दुसर्या प्रकरणात गुंजाळवाडी शिवारातील रामदास सूर्यभान रोहोम (वय 45, रा.गुंजाळवाडी) या इसमाच्या स्वीफ्ट डिझायर (क्र.एम.एच.14/बी.आर.7400) या वाहनात 2 हजार 496 रुपये किंमतीच्या बॉबी संत्रा देशी दारुच्या 48 बाटल्या सापडल्याने पोलिसांनी त्याच्या वाहनासह त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारसह 5 लाख 22 हजार 496 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पो.ना.राजेश जगधने यांनी फिर्याद दिली आहे.
खराडी शिवारातही अर्जुन भागाजी पवार हा इसम घराच्या आडोशाला देशी दारुची विक्री करीत असल्याचे समजल्यावरुन पोलिसांनी तेथे छापा घातला, मात्र आरोपी पसार झाला. या कारवाईत पोलिसांना 2 हजार 496 रुपयांच्या बॉबी संत्रा देशी दारुच्या 48 बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांनी फिर्याद दिली आहे. असाच प्रकार समनापूर शिवारातही आढळला. येथील शौकत आयुब शेख हा इसम हॉटेल नशीबच्या आडोशाला देशी दारु विक्री करीत असताना पोलिसांनी तेथे छापा घातला, मात्र आरोपी मुद्देमाल सोडून पळून गेला. त्या ठिकाणाहून पोलिसांना बॉबी संत्रा देशीदारुच्या 90 मिली लिटरच्या 50 1 हजार 300 रुपयांच्या बाटल्या सापडल्या.
तर शेवटची कारवाई तालुक्यातील देवगाव शिवारात करण्यात आली. या परिसरात आरोपी राजहंस रतन शिंदे (वय 53) हा विदेशी दारु विक्री करीत असताना पोलिसांनी तेथे छापा घातला असता पळून गेला. त्याने तेथेच टाकलेल्या 5 हजार 500 रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. एकंदरीत शहर पोलिसांनी आपल्या हद्दीतील पाच ठिकाणी छापेमारी करुन बेकायदा दारु विकणार्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिसांना तब्बल 5 लाख 39 हजार 396 रुपयांचा मुद्देमाल मिळाला खरा, मात्र पोलिसांच्या हाती केवळ एकच आरोपी लागला. उर्वरीत चार आरोपी मात्र पोलिसांना तुर्या देत त्यांच्या डोळ्यादेखत पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवायांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचे संक्रमण भरात आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने संपूर्ण तालुका कोविडच्या दहशतीखाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांवरही कोविडबाबत मोठ्या जबाबदार्या असल्याने त्यांच्याकडून अवैध व्यवसायांकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फायदा घेत काही असामाजिक प्रवृत्ती आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. मात्र पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत धडक कारवाया करताना तालुक्यातून वाहणारा दारुचा महापूर आटवला असून हातभट्टीही उध्वस्त केली आहे.