तिसर्‍या लाटेत मुलांना धोका असल्याबाबत मतमतांतरे! मात्र जिल्ह्यातील अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संक्रमण वाढले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसत असतांनाच संभाव्य तिसर्‍या लाटेची चर्चा आणि तयारी सुरु झाली आहे. तिसर्‍या संक्रमणाबाबत वेगवेगळ्या पातळ्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये मोठी मतमतांतरे आहेत. तिसर्‍या लाटेचा सर्वाधीक फटका लहान वयातील मुलांना बसणार असल्याचे सांगीतले जात असतांना त्याबाबत कोणतेही पुरावे समोर नसल्याचे जागतिक पातळीवरील चर्चांमधून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असतांनाच ओसरणार्‍या दुसर्‍या लाटेत 18 वर्षांपेक्षा कमी वयातील बाधितांची संख्या लक्ष्य वेधू लागली आहे. रविवारी जिल्ह्यातील एकूण अहवालांमध्ये 13 टक्क्यांहून अधिक बाधितांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने मुलांमध्ये संक्रमण वाढू लागल्याचा निष्कर्ष जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे. रविवारी जिल्ह्यात 1 हजार 851 रुग्ण समोर आले होते. त्यात 1 ते 18 वयोगटातील 246 मुलांचा समावेश आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब असून जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष कार्यान्वीत केला आहे.

देशात येणारी कोविडची संभाव्य तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये अधिक संक्रमण पसरवणारी आणि जीवघेणी असेल अशा आशयाचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून माध्यमांद्वारे निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतातील संभाव्य तिसरे संक्रमण लहान मुलांसाठी जीवघेणे असेल याबाबत मतभिन्नता आहे. तिसर्‍या संक्रमणात लहान मुलांमध्ये संक्रमण वाढण्याची शक्यता असली तरीही त्यातून जीव जाण्यासारखा गंभीर प्रकार घडेल याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे विविध तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेबाबत आणि त्याच्या संक्रमणाच्या फटक्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचे सिद्ध झाले आहे.

मात्र त्याचवेळी गेल्या काही दिवसांत संक्रमितांच्या यादीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या वाढत असल्याचेही समोर आले आहे. रविवारी (ता.23) जिल्ह्यात 1 हजार 851 रुग्ण आढळले. त्यात 1 ते 5 या वयोगटातील 22, 6 ते 10 या वयोगटातील 63, 11 ते 15 या वयोगटातील 91 तर 16 ते 18 वयोगटातील 69 जणांचा समावेश आहे. त्यातही जिल्ह्यातील 1 ते 18 या वयोगटात रविवारी सर्वाधीक 28 रुग्ण पारनेर तालुक्यात आढळून आले. त्या खालोखाल श्रीगोंदा व पाथर्डी तालुक्यात 25, अकोले तालुक्यात 22, कर्जत तालुक्यात 21, नगर ग्रामीणमध्ये 19, राहुरी तालुक्यात 18, संगमनेर तालुक्यात 16, नेवासा तालुक्यात 14, कोपरगाव व राहाता तालुक्यात 11, जामखेड, श्रीरामपूर व अहमदनगर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 10, शेवगाव तालुक्यात चार तर इतर जिल्ह्यातील दोघा रुग्णांचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट सध्या वेगाने ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दररोज समोर येणार्‍या रुग्णासंख्येत निम्म्याहून अधिक घट झाल्याचेही गेल्या काही दिवसातील आकडेवारीतून स्पष्ट झाल्याने या वृत्ताला अधिक बळकटी मिळाली आहे. मात्र त्याचवेळी शासन व प्रशासनाकडून संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत तयारी सुरु झाल्याने व त्यातही अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केल्याने व त्यासाठी विशेष टास्क फोर्सही कार्यान्वित केल्याने तिसर्‍या लाटेत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये कोविड संक्रमणाचा वेग अधिक असेल असेच काहीसे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मात्र त्याचवेळी येणारे संक्रमण विशिष्ट वयोगटातील नागरिकांना लख्य करील याबाबत वैद्यकीय क्षेत्रात अद्यापही एकमत नसल्याने काहीसा संभ्रमही निर्माण झाला आहे.

काही तज्ज्ञांच्या मते काळ्या बुरशीनंतर आता कोरोनातून बरे झालेल्या मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टीम इनफ्लमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) हा आजारा बळावण्याची शक्यता आहे. कोविडचा संसर्ग शिखरावर असतांना हा आजार दिसून आला होता. मुलांमध्ये त्याच्या संसर्गाचा वेग अधिक असल्याचेही समोर आले होते. फोर्टीस हेल्थ केअर सेंटरचे बालरोगतज्ज्ञ डॉ.योगेशकुमार गुप्ता यांच्या मते हा जीवघेणा आजार नसला तरीही मुलांमध्ये त्याचा संसर्ग झाल्यानंतर तो उग्ररुप धारण करतो आणि त्यातून हृदय, यकृत व मूत्रपिंडाला इजा होण्याची दाट शक्यता असते. कोविड संक्रमणानंतर चार ते सहा आठवड्यांनी या रोगाचा संसर्ग दिसू लागतो असा निष्कर्षही डॉ.गुप्ता यांनी काढला आहे.

एकीकडे राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमण आटोक्यात येत असतांना दुसरीकडे संभाव्य तिसरी लाट आणि कोविड बाधित होवून बरे झालेल्या मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टीम इनफ्लमेटरी सिंड्रोम’चा संसर्ग होण्याची शक्यता आणि त्यातच तिसर्‍या संक्रमणाचा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना असलेला धोका याबाबत वेगवेगह्या पातळ्यांवरील चर्चा आणि शासन व प्रशासनाकडून त्यादृष्टीने सुरु असलेली तयारी लक्षात घेता नागरिकांनी पहिल्या संक्रमणानंतर तो निष्काळजीपणा दाखवला तसाच आत्ताही दाखवल्यास तिसर्‍या कोविड संक्रमणाचे दुष्परिणाम अधिक घातक ठरतील असाच निष्कर्ष या सगळ्यातून समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *