… अखेर कोंभाळणेतील जळीतग्रस्त कुटुंबियांना मिळाला हक्काचा निवारा! रावसाहेब वाकचौरे यांच्यासह मित्रमंडळाच्या सहकार्याचे होतेय सर्वत्र कौतुक
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या बारा दिवसांपूर्वी तालुक्यातील कोंभाळणे येथील चार आदिवासी ठाकर कुटुंबियांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ती कुटुंब बेघर झाली होती. या चारही कुटुंबांना अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. मात्र, माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या सूचनेनुसार वीरगाव येथील आनंद दिघे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आणि अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी 800 चौरस फुटाचे लोखंडी पत्र्याचे घर उभारुन गुढीपाडव्याला त्यांना अनोखी भेट दिली आहे. या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल त्यांच्यासह दानशूरांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कोंभाळणेत आदिवासी बांधवांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाली होती. याबाबत माध्यमांत प्रसिद्धी झाल्यावर राज्यभरातून मदत होऊ लागली. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर, राष्ट्रवादी, शिवसेना यांसह कुणी अन्नधान्य तर कोणी इतर साहित्य दिले. शासनानेही पंचनामा करत मदत देण्याचे जाहीर केले. मात्र ‘सरकारी काम आणि चार दिवस थांब’ या म्हणीप्रमाणे कागदपत्रे फिरत आहे. अन्नधान्याची सोय झाली होती. मात्र बेघर कुटुंबांना निवारा आवश्यक होता. ही बाब पिचड आणि वाकचौरे यांनी हेरली. त्यांनी गुढीपाडव्यापर्यंत निवारा उभा करण्याचा मानस व्यक्त करुन साहित्याची जुळवाजुळव करुन पाच-सहा दिवसांपूर्वी कामाला सुरुवात केली.
अखेर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला घराचे काम पूर्ण केले. गुढीपाडव्याला संसारोपयोगी साहित्य, कपडे देऊन पिचड यांच्या हस्ते गुढी उभारून या कुटुंबाला पुरण-पोळीचे गोड जेवण देण्यात आले. तत्पूर्वी पिचड यांनी 21 हजार रूपये रोख, ताडपत्री, किराणा व धान्य दिलेले आहे. त्यानंतर वाकचौरे व त्यांच्या मित्रमंडळाने हक्काचा निवारा उभा केला आहे. यामध्ये वीरगावचे उपसरपंच संजय थोरात, दत्ता भागडे, लहानू अस्वले, अंकुश ढमाले, सुनील मेंगाळ, शांताराम तोरमल आदिंनी सहकार्य केले आहे.
जळीतग्रस्त कुटुंबियांना समाजातील दानशूरांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला. यामध्ये अकोले तालुकावासियांसह सर्वपक्षीयांनी देखील भरभरुन मदत केली. मात्र, रावसाहेब वाकचौरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हक्काचा निवारा देण्याचे जाहीर केले. त्यास प्रत्यक्षात साकार केल्याने त्यांना समाधान मिळाले तर जळीतग्रस्त कुटुंबियांचे चेहने आनंदाने फुलले होते.