पोलीस नाईकाच्या लाचखोरीचे प्रकरण भोवले! अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार पुन्हा ‘कंट्रोल जमा’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्तव्य बजावताना त्याबदल्यात सर्वसामान्य नागरिकांकडून लाच घेतल्याचे समोर आल्यास त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षाचा बदली केली जाईल. असा नियम नाशिक परिक्षेत्रात लागू आहे अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांना या नियमाचा अवघ्या सहा महिन्यात तब्बल दुसऱ्यांदा फटका बसला आहे. गेल्या मंगळवारी अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप पांडे याला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते, तेव्हाच परमार यांची मुख्यालयात हजेरी होणार हे निश्चित होते. त्यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. काल दुपारी बाराच्या सुमारास अहमदनगरच्या दिशेने जात असताना निमगाव जाळीजवळ त्यांच्या वाहनाला अपघातही झाला, किरकोळ दुखापत झाली आहे.
अत्याचाराविरोधातील तक्रारी घेऊन सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्याची पायरी चढत असतात. अशा नागरिकांमध्ये कायद्याविषयी आदर असतो. मात्र, त्याच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या काही लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनैतिक वागण्यातून नागरिकांचा संपूर्ण पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. या सर्व गोष्टींचा विचार करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्या आदेशान्वये अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्या विषयीच्या नियमांची जिल्ह्यात सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या कालखंडात जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या ठाण्यातील लाचखोरीच्या प्रकरणात ‘कंट्रोल जमा’ करण्यात आले होते. त्यात अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांचाही समावेश होता.
गेल्या मंगळवारी (ता.18) अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप पांडे याने तक्रारदाराकडून मागितलेली पाच हजारांची लाच स्वीकारताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले होते. अकोले पोलिस ठाण्यात तिघां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पांडे याने त्या तिघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मध्यस्थाशी बोलणी करताना तक्रारदाराचा साडू आणि एका मुलावर चाप्टर केस तर दुसऱ्या मुलाचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे ठरले. पैशाची तजवीज करून दुपारपर्यंत पैसे आणून देतो असे सांगत तक्रारदार आपला साडू आणि दोन मुलांसह घरी गेला.
यादरम्यान तक्रारदाराने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. अहमदनगरच्या पथकाने तातडीने अकोल्यात येऊन तक्रारीची खातरजमा करुन पोलिस ठाण्याच्या भोवती सापळा रचला. त्यात पोलीस नाईक संदीप पांडे अलगद फसला आणि पकडला गेला. या कारवाईनंतरचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून सदर प्रकरणाची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर गृहीत धरुन पो.नि.अभय परमार यांना मुख्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सदरचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (ता.21) दुपारी ते लोणी मार्गे नगरच्या दिशेने जात असताना निमगाव जाळी जवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसानही झाले. मात्र सुदैवाने किरकोळ मुक्कामार वगळता कोणालाही दुखापत झाली नाही. सध्या ते अकोल्यातच आहेत. एकाच पोलीस ठाण्यात, अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत, एकाच पोलीस निरीक्षकाची तब्बल दोन वेळा मुख्यालयात हजेरी होण्याची ही जिल्ह्यातील बहुदा पहिलीच घटना असेल.
मागील वेळी संगमनेर व अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकांच्या लाचखोरीचे प्रकरण एका दिवसाच्या अंतराने समोर आले होते. त्यावेळीही प्रकरणाचा ठपका ठेवून अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार व संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. जवळपास महिन्याभरानंतर त्यांना पुन्हा नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा पोलिस नाईकाच्या लाचखोरीच्या प्रकरणात पोलिस निरीक्षक अभय परमार यांना कंट्रोल जमा व्हावे लागले आहे. पोलीस नाईकाने खाल्लेली लाच पोलीस निरीक्षकांना पुन्हा भोवल्याची याची चर्चा यानिमित्ताने अकोल्यात सुरु आहे.
Visits: 10 Today: 1 Total: 116945