संगमनेर तालुक्यात आजही आढळले जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्ण! जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्या मात्र दोन हजाराहून कमी आल्याने दिलासा कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणात एकसारखी घट होत असून गेल्या दोन महिन्यात रुग्ण संख्येचे डोंगर अनुभवणार्या अहमदनगर जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याच वेळी उत्तरेतील संगमनेर व अकोले या दोन तालुक्यांमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्ण सापडण्याची श्रृंखला आजही कायम आहे. आज संगमनेर तालुक्यात 354 तर अकोले तालुक्यात 204 रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजारांचा टप्पा ओलांडून 21 हजार 24 वर पोहोचली आहे.

फेब्रुवारीच्या मध्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांंसह सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाल्याने व तत्पूर्वीच्या महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळाही उडाल्याने आटोक्यात आलेल्या संक्रमणाला एक प्रकारे निमंत्रणच मिळाले. त्याचा परिणाम मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊन आरोग्य यंत्रणांची कसोटीही पाहिली गेली. या काळात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने ठिकठिकाणाहून रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या वार्ताही कानावर आल्या. त्याचा परिणाम जिल्ह्यातील रुग्णवाढीसह मृतांच्या संख्येतही अनपेक्षितपणे मोठी भर पडून जिल्ह्याची स्थिती एक वेळ अतिशय चिंताजनक अवस्थेत पोहोचली होती.

मात्र गेल्या आठवड्यापासून दररोज समोर येणाऱ्या रुग्णसंख्येत हळूहळू घट होत असल्याचे चित्र दिसत असल्याने कोविडचे दुसरे संक्रमण आटोक्यात येत असल्याचा दिलासा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सरासरी रुग्णगती घटली असली तरीही उत्तरेतील संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यातून मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्ण समोर येत आहेत. संगमनेर तालुक्यातील रुग्ण वाढ अतिशय चिंताजनक असून यापूर्वी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रादुर्भाव असलेल्या अहमदनगर ग्रामीण क्षेत्रालाही तालुक्याने मागे टाकले आहे. आजही तालुक्यातील 354 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या आता 21 हजारांचा टप्पा ओलांडून 21 हजार 13 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील कोविड संक्रमणाला लागलेली ओहोटी आजही कायम असल्याने जिल्हावासीयांना मात्र दिलासा मिळण्याचा सिलसिला आज चौथ्या दिवशीही कायम आहे. आज जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन हजाराहून खाली आल्याने एक प्रकारे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 140, खासगी प्रयोगशाळेच्या 869 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 847 अहवालांमधून जिल्ह्यातील 1 हजार 856 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक 354 रुग्ण संगमनेर तालुक्यातून समोर आले आहेत. त्याशिवाय अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148, अहमदनगर महापालिका क्षेत्र 126, पारनेर व पाथर्डी प्रत्येकी 116, नगर ग्रामीण 95 नेवासा 92 कर्जत 91 राहाता 86 श्रीगोंदा 76, कोपरगाव 69, शेवगाव 47, जामखेड 28, इतर जिल्ह्यातील 22 व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा आजच्या बाधित संख्येत समावेश आहे.

संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणात दररोज वाढ होत असूनही रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यासोबतच अनेकांना कोविडचे संक्रमण झालेले असूनही केवळ त्रास होत नाही अथवा लक्षणे दिसत नाहीत म्हणून अनेकजण स्वतःला विलगीकरणात ठेवण्याऐवजी रस्त्यावर फिरत असल्याचे समोर आले आहे. आजही संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या 93 जणांची रॅपीड अँटीजेन चाचणी केली. त्यातून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर शहरातील रस्त्यावरून अद्यापही शंभरातील 9 व्यक्ती संक्रमित होऊन फिरत असल्याचे समोर आले आहे..

Visits: 92 Today: 2 Total: 1116263
