अकोलेत प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित वरची पायरी मिळते ः डॉ. घोगरे डॉ. संजय घोगरे यांची अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेच्या मातीचा इतिहास आहे की येथे प्रामाणिकपणे काम केले तर वरची पायरी निश्चित मिळते, अशी भावना नुकतीच अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झालेले डॉ. संजय घोगरे यांनी व्यक्त केली.
अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे यांची अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्याने अकोले ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलर होते. डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, डॉ. सुनील साळुंके, डॉ. सुरेखा पोपेरे, रुग्णकल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी प्रा. सुरेश खांडगे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन नवले, डॉ. जयसिंग कानवडे, डॉ. अनिल वाघ, डॉ. संदेश भांगरे, डॉ. संदीप कडलग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, सुबोध मोहिते, डॉ. इंद्रजीत गंभिरे, डॉ. सखाराम घनकुटे, डॉ. सुवर्णा मेहेत्रे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. घोगरे म्हणाले की माझ्या नोकरीतील 25 वर्षांपैकी 15 वर्षे मी अकोले तालुक्यात काम केले आहे. माझी पहिलीच नियुक्ती ही तालुक्यातील आदिवासी भागातील कोहणे येथे झाली होती. यामुळेच कदाचित मला याच जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तालुक्यातील गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभले. ज्या गावात नोकरीला लवकर कोणी जात नव्हते अशा कोहणे गावात मी मुख्यालयी राहून जनतेला सेवा दिली आहे. माणसाने जिद्दीने काम केले तर अपयश येत नाही. शासकीय नोकरीतील प्रत्येकाने पगारापैकी 10 टक्के जरी प्रामाणिक काम केले तरी निश्चितपणे जनतेला चांगली सेवा मिळेल. मलाही आता जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी वाढणार आहे. मलाही त्या पदाला न्याय देण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी येथेही प्रत्येकाने पदाला न्याय देण्याचे काम करावे व मलाही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या घरात चार माणसं संभाळणं अवघड असते. मात्र डॉ. घोगरे यांनी एवढे मोठे अकोले ग्रामीण रुग्णालय कुटुंबासारखे सांभाळले. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे हे त्यांनी शक्य केले. एखाद्या अधिकार्याला दुसर्या ठिकाणी जबाबदारी दिल्यावर त्याला तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते बोलावून घेतात हा त्या अधिकार्याच्या कार्यकौशल्याचा सन्मान असतो तो घोगरे डॉक्टरांचा झालेला आहे, असे सुरेश खांडगे म्हणाले. कोविड काळात एवढे चांगले काम होते की डॉ. घोगरेंना जिल्हा प्रशासनाने कामाची दखल घेऊन शिर्डी येथील पदभार दिला होता. मात्र त्यावेळी अकोलेत खळबळ उडाली व तालुक्यातील जनतेने रेटा लावला की आम्हाला डॉ. घोगरे पुन्हा अकोलेत पाहिजे. तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून पुन्हा डॉ. घोगरेंना अकोलेत रूजू केले, असा प्रसंग डॉ. अनिल वाघ यांनी कथन केला. सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले तर आभार डॉ. सुनील साळुंके यांनी मानले. ब्रदर आकाश देसाई, अशोक शिरतार, सर्व परिचारिका, परिचर, शिपाई, कर्मचारी आदी उपस्थित होते.