राहाता ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा आमदार राधाकृष्ण विखेंच्या पाठपुराव्याला यश; प्रतिदिन 125 जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता

नायक वृत्तसेवा, राहाता
कोविड संकटात मोठ्या प्रमाणात भेडासवलेल्या प्राणवायू तुटवड्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात सुमारे 1 कोटी 53 लाख रुपयांचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना उपचारांत ऑक्सिजन अभावी अनेक निरापराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन बेड अभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली ससेहोलपट ही भयंकर होती. अशा सर्व पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उत्तर म्हणून आमदार विखे-पाटील यांनी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी करून याचा पाठपुरावा शासनाकडे केला होता.

राहाता तालुक्यात 3 ग्रामीण रुग्णालय, 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालय मोठ्या संख्येने आहेत. कोविड संकटाच्या दुसर्‍या संक्रमणात रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोविडसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह शिर्डी संस्थानच्या व प्रवरा कोविड सेंटरमध्ये बेडची सुविधा उपलब्ध झाली असली तरी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याकडे आमदार विखे-पाटील यांनी लक्ष वेधले होते.

शिर्डी येथे संस्थानने प्रकल्प उभारला असला तरी तिथे निर्माण होणारा ऑक्सिजन हा संस्थानच्या रुग्णालयालाच उपयोगी पडेल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व इतर रुग्णालयांना पुन्हा ऑक्सिजनची टंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्याची मागणी आमदार विखे-पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय राहाता येथे 1.56 कोटी रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीस मंजुरी देवून उभारणी कामाचा कार्यारंभ आदेश सुद्धा दिला आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन 125 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी लिक्विडची आवश्यकता नाही. हवेतूनच ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याची माहिती देतानाच, या प्रकल्पासाठी 200 के. व्ही. क्षमतेचे जनरेटर व ग्रामीण रुग्णालयात 40 बेडच्या प्रकल्पासाठीच्या ऑक्सिजन पाईपलाईनकरीता आमदार निधीतून निधीची उपलब्धता करुन देणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

Visits: 122 Today: 1 Total: 1417775

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *