म्युकरमायकोसिसचे श्रीरामपूरमध्ये पाच तर राहात्यात चार रुग्ण साखर कामगार रुग्णालयात एका रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यात म्युकरमायकोसिस आजाराने प्रवेश केला असून श्रीरामपूरमध्ये 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णावर येथील साखर कामगार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीही झाली असल्याची माहिती तालुका आरोेग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्या लाटेने हाहाकार करुन सोडला होता. त्यात आता म्युकरमायकोसिस हा आजार नव्याने आला असून श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील 9 जणांना या आजारावर जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार सुुरू आहेत. या रुग्णांवर यात एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून त्याच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉ.प्रणवकुमार ठाकूर, डॉ.गणेश जोशी, डॉ.शरद सातपुते, डॉ.ऋतुजा जगधने यांनी ही शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाली आहे. सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे डॉ.रवींद्र जगधने यांनी दिली.
म्युकरमायकोसिस हा कोरोनापेक्षाही जास्त घातक ठरत आहे. यामागील कारण आहे की, कोरोना आपल्याला सांभाळून घेण्यासाठी वेळ देतो. जर चांगल्याप्रकारे उपचार झाले तर 7 ते 21 दिवसांमध्ये रुग्ण यातून बाहेर पडू शकतो. बर्याचदा तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज पडत नाही. काही औषधे आणि पथ्यांचे पालन केले तर केले तर रुग्ण घरी देखील बरा होऊ शकतो. पण म्युकरमायकोसिस एवढा घातक असून आपल्याला सांभाळून घेण्याची संधीही देत नाही. याचं मुख्य कारण आहे की म्युकरमायकोसिसचा परिणाम सर्वात आधी नाक आणि जबड्याच्या आजूबाजूला असणारे सायनसेस यावर होतो आणि तिथून डोळ्यांकडे पसरतो. गंभीर परिस्थितीमध्ये मेंदूचा देखील समावेश होतो. डोळे, जबडा, नाक हे मेंदूपासून खूप जवळ आहेत. याच्या उपचारांसाठी शस्त्रक्रियेसोबत औषधे देखील खूप गरजेचे आहेत. औषधंची उपलब्धता कमी आणि खूप महाग असल्यामुळे रुग्णाला खूप खर्च येतो. जसे कि म्युकरमायकोसिस हा गावागावांमध्ये पसरत आहे आणि आत्तापर्यंत रुग्णाला उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागायचे. त्यामुळे शहरामध्ये हॉस्पिटलचा तसेच राहण्याच्या खर्चाचा भारही रुग्णावर येतो, असेही डॉ.प्रणवकुमार ठाकूर यांनी सांगितले.
काळ्या बुरशीची लक्षणे..
काळ्या बुरशीमध्ये बर्याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे व आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.