अवघ्या चोवीस तासांतच संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत दीडशे रुग्णांची भर! मागील चार दिवसातील सरासरीने गाठला तालुक्यातील आजवरच्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पहिल्या संक्रमणातील सर्व विक्रम मोडण्याच्या दिशेने मार्चच्या पहिल्याच दिवसापासून मार्गक्रमण करणार्‍या कोविडने एकामागून एक उच्चांक नोंदवित संगमनेर तालुक्यातील अवस्था चिंताजनक स्थितीत नेवून पोहोचवली आहे. रोज एकमेकांशी स्पर्धा करणारी रुग्णसंख्या समोर येत असल्याने तालुक्यातील कोविडचे संक्रमण पुन्हा एकदा जोमात आले असून चालू महिन्यात कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी सायंकाळी तालुक्यातून विक्रमी 84 रुग्ण आढळून आल्यानंतर आज सकाळी त्यात आणखी 66 नवीन रुग्णांची भर पडल्याने अवघ्या चोवीस तासांतच तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल दीडशे रुग्णांची वाढ होवून तालुका आता 7 हजार 878 रुग्णसंख्येवर जावून पोहोचला आहे. सध्या तालुक्यातील 478 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात कोविडच्या संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात चढत्याक्रमाने त्यात वाढ होत सप्टेंबर महिन्यात सरासरी 51 रुग्ण प्रति दिवसाच्या वेगाने 1 हजार 529 रुग्णांची एकाच महिन्यात विक्रमी भर पडली. मात्र त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव टप्प्याटप्प्याने नियंत्रणात येत जानेवारीत ही संख्या सरासरी 9.70 रुग्ण दररोज या गतीपर्यंत खाली आली होती. मात्र फेब्रुवारीत काही असंवेदनशील लोकांनी आपल्या पाल्यांच्या विवाहात मोठी गर्दी केल्याने त्याचे दुष्परिणामही फेब्रुवारीतच समोर यायला सुरुवात झाली आणि खाली आलेली रुग्णगती पुन्हा एकदा आकाशाच्या दिशेने धावण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारीत कोविडकडे दुर्लक्ष करुन ‘बिनधास्त’ साजर्‍या झालेल्या काही विवाह सोहळ्यांनी कमी झालेल्या सरासरीत दुप्पट वाढ केली आणि फेब्रुवारीत तालुक्यातील 495 बाधित समोर आले. रुग्णवाढीचा हा वेग मार्चमध्येही कायम राहीला. पहिल्या आठ दिवसांत कमी-अधिक प्रमाणात रुग्ण समोर येतायेता 8 मार्चपासून रुग्णगतीचा वेग अचानक वाढला आणि आजच्या स्थितीत तो थेट 47 रुग्ण दररोज या गतीवर जावून पोहोचला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेली सर्वाधीक रुग्णवाढ 51 रुग्ण दररोज या गतीने झाली होती. मार्च महिना संपण्यास अद्यापही आठ दिवसांचा कालावधी असून आजवरचा कोविड रुग्णवाढीचा आलेख बघता गेल्यावर्षीचा विक्रम मोडण्याची शक्यताही त्यातून निर्माण झाली आहे.

सोमवारी या श्रृंखलेत मार्च महिन्यातील सर्वाधीक 84 रुग्ण समोर आले. त्यात शहरातील 35 तर ग्रामीणभागातील 49 रुग्णांचा समावेश होता. तर आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील 21 जणांसह एकूण 66 जणांची त्यात भर पडली. त्यामुळे अवघ्या चोवीस तासांतच तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत विक्रमी 150 रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्याची कोविड स्थिती पुन्हा एकदा भयानक अवस्थेकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. आज (ता.23) आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील चंद्रशेखर चौकातील 40 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 43 वर्षीय महिला, सुयोग सोसायटीतील 41 व 36 वर्षीय तरुणांसह 32 वर्षीय महिला,

गिरीराज नगरमधील 27 वर्षीय महिला, स्वातंत्र्य चौकातील 55 वर्षीय इसम, विद्यानगरमधील 44 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 22 वर्षीय तरुणासह 18 वर्षीय तरुणी, गोविंद नगरमधील 35 वर्षीय महिला, साईनगर मधील 55 वर्षीय महिला, देवीगल्लीतील 64 वर्षीय इसमासह 41 वर्षीय तरुण व 62 वर्षीय महिला, वडजे मळ्यातील 59, 32 व 26 वर्षीय महिलांसह 38 वर्षीय तरुण आणि संगमनेर असा पत्ता असलेल्या 35 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील साकूर येथील 70 वर्षीय महिला,

48 वर्षीय इसम, 25 वर्षीय तरुण आणि 13 व 5 वर्षांच्या मुलांसह 7 व 3 वर्षीय मुली, चणेगाव येथील 53 वर्षीय इसम, गोल्डन सिटीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा येथील 40 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 42 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 51 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुणी, खांडगाव येथील 30 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 29 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 47 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 58 व 46 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, 29 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी व 17 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 17 वर्षीय तरुण, चिखलीतील 62 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय तरुणी व 13 वर्षीय मुलगा, मालदाड येथील 32 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 60 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण,

संगमनेर खुर्दमधील 46 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण व 43 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय तरुणी, रायते येथील 36 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगा व 10 वर्षीय मुलगी, नान्नज दुमाला येथील 42 वर्षीय तरुण, सांगवी येथील 35 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 27 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावरगाव तळ येथील 22 वर्षीय तरुण व मंगळापूर येथील 55 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण अशा ग्रामीण भागातील 45 जणांसह एकूण 66 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 878 झाली आहे. त्यातील 478 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासह अन्य काही सण-उत्सवांमुळे सप्टेंबरमध्ये तालुक्याने उच्चांकी 1 हजार 529 रुग्णसंख्या गाठली होती. नववर्षात कोविडचा प्रादुर्भाव संपला असे जाणवत असतांना झालेल्या काही विवाह सोहळ्यांनी मात्र आहे त्या स्थितीत विरझन कालवून तालुक्याला पुन्हा कोविडच्या दरीत लोटण्याचे काम केले. गेल्या 23 दिवसांत आत्तापर्यंत तालुक्यातून एकूण 1 हजार 69 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून उर्वरीत आठ दिवसांत तालुका सप्टेंबरच्या सरासरीजवळ अथवा त्या पल्याड जाण्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 99055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *