जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये मिळून बत्तीस टक्के पाणीसाठा! पाणलोटात मान्सून सक्रीय; भंडारदरा वगळता उर्वरीत धरणांना मात्र नवीन पाण्याची प्रतीक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध अडथळ्यांची शर्यत ओलांडीत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून लाभक्षेत्रातही बहुतेक ठिकाणी मान्सूनच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे एकीकडे बळीराजाची लगबग बघायला मिळत असतांना दुसरीकडे उत्तर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही कासवगतीने वाढू लागला आहे. रविवारच्या तुलनेत गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कोसळलेल्या पावसाने भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात 169 दलशलक्ष घनफूटाची भर घातली आहे. मान्सूनच्या आगमनासोबतच सह्याद्रीच्या घाटमाथ्यानेही आपलं रुपडं बदलायला सुरुवात केल्याने मुळा व प्रवरा खोर्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना हुलकावणी देत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांसह बहुतेक सर्वच धरणांच्या पाणलोटात हजेरी लावली. त्यामुळे एकवेळ वातावरणीय बदलांमुळे मान्सूनच्या प्रवासात दीर्घकाळ खोळंबा झाल्याने चिंतातूर झालेल्या लाभक्षेत्रातील बळीराजाच्या चेहर्यावर आनंदाची लकेर उमटत असतांनाच लाभक्षेत्रातही बहुतेक सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात मान्सून बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. सध्या तालुक्यातील अनेक भागात खरीपाच्या पेरण्याची लगबग पाहायला मिळत आहे.

मागील वर्षीप्रमाणेच लाभक्षेत्रातील संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला असून वरुणराजाने जूनमधील सरासरी ओलांडली आहे. त्यासोबतच अकोले, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अकोले तालुक्यातील दुर्गम भागातही आत्तापर्यंत चांगला पाऊस झाल्याने आदिवासी पाड्यात भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येवू लागला आहे. अर्थात पाणलोटासह आदिवासी पट्ट्यात अजूनही पावसाला म्हणावा तसा जोर चढलेला नाही. मात्र यंदा मुबलक प्रमाणात पाऊस होण्याची व तो दीर्घकाळ लांबण्याचीही शक्यता आहे.

मान्सूनच्या आगमनानंतर भंडारदरा धरणाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागात येतात. त्यातून या परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यंदा लहरी वातावरणामुळे काजवा महोत्सवाचा कालावधीही घटल्याने त्याचा फटका येथील हॉटेल व्यावसायिकांना बसला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पाणलोटातील मान्सून सक्रीय असल्याने सह्याद्रीच्या डोंगरकपारीतून पाण्याचे छोटे-मोठे ओहोळ धरणीकडे धावू लागले आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मान्सून टिकून असल्याने सह्याद्रीचे माथे हिरव्या रंगाचे शालू पांघरु लागले आहेत. त्यामुळे निसर्गाने आपले रुप बदलण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांचे पायही आता हळूहळू धरणांच्या पाणलोटाकडे वळू लागले आहेत.

आज सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे 36 मिलीमीटर, रतनवाडीत 14 मिलीमीटर, पांजरे येथे 9 मिलीमीटर, भंडारदरा येथे 8 मिलीमीटर, वाकी येथे 4 मिलीमीटर व कोतूळ येथे 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर लाभक्षेत्रातील लोणी येथे 59 मिलीमीटर, शिर्डी 35 मिलीमीटर, श्रीरामपूर व ओझर येथे 32 मिलीमीटर, आश्वी 28 मिलीमीटर व संगमनेर येथे 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 9 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठा 2 हजार 418 दशलक्ष घनफूट (21.90 टक्के) झाला आहे. सध्या निळवंडे धरणात 3 हजार 552 दशलक्ष घनफूट (42.69 टक्के), मुळा 8 हजार 335 दशलक्ष घनफूट (32.06 टक्के), आढळा 418 दशलक्ष घनफूट (39.43 टक्के) व भोजापूर 21 दशलक्ष घनफूट (5.82 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तीन धरणांवर जिल्ह्यातील समृद्धी अवलंबून आहे. जिल्ह्यात मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता सर्वाधिक 26 हजार दशलक्ष घनफूट आहे. त्या खोलोखाल भंडारदरा 11 हजार 39 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणाची क्षेमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या तीनही धरणांत मिळून एकूण 45 हजार 359 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा केला जातो व आवर्तनाच्या रचनेतून सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा होता. सध्या या तिनही धरणात मिळून 14 हजार 305 दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे. गेल्या 20 जून रोजी भंडारदर्यातून सिंचनासाठीचे आवर्तन सोडण्यात आले होते, मात्र लाभक्षेत्रातही मान्सूनचे आगमन झाल्याने ते अवघ्या पाच दिवसांत बंद करण्यात आले आहे. त्यातून 191 दशलक्ष घनफूट पाणीही खर्ची पडले आहे.

