राहाता ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक लसीसाठी मारताहेत हेलपाटे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसच मिळेना; प्रशासनाविरोधात संतापाची भावना
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 45 वर्षे व त्यापेक्षा जास्त वर्षांच्या नागरिकांसाठी महिन्या-दीड महिन्याभरापूर्वी राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये राहाता व शिर्डीसाठी लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. पहिला डोस कोव्हॅक्सिन व कोविशील्ड देण्यात आला. तर आता कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक नाहीयेत. 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.

केंद्र व राज्य सरकारने सुरुवातीला 60 पेक्षा व नंतर 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. यात काहींना कोव्हॅक्सिन तर काहींना कोविशील्ड देण्यात आली. या लोकांनी लस घेतल्यानंतर त्यांच्या अनुभवावर इतर सुद्धा लस घेण्यासाठी प्रवृत्त झाले. ज्या नागरिकांनी सुरुवातीला लसीकरण मोहिमेचा चांगला प्रचार केला त्यांनाच 45 दिवस तर काही लोकांचे त्यापेक्षा जास्त दिवस होऊनही कोव्हॅक्सिन लस मिळेनासी झाल्याने ते चांगलेच हवालदिल झाले आहेत. तर काहींनी आम्ही पुन्हा बाधित होणार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली. सरकारने लस घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी जे अॅप दिले आहे त्या अॅपवर गुजरात राज्य टाकल्यावर येथील जिल्ह्यातील कित्येक केंद्रावर कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असल्याचे दिसते. मग आपल्या राज्यात लस घेण्यासाठी एवढी कसरत का करावी लागत आहे.

तर 1 मे पासून 18 ते 44 वय असलेल्यांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. त्यामुळे सुद्धा ही लस मिळणे अवघड झाले आहे. लस सर्वांना देणे गरजेचे आहे परंतु ज्यांचा पाहिला डोस झाला त्यांना क्रमप्राप्त दुसरा डोस उपलब्ध करून द्यावा, अशी ज्येष्ठांची माफक अपेक्षा आहे. यावर प्रशासन योग्य उपाययोजना करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लस घेण्यासाठी हे ज्येष्ठ नागरिक सकाळीच घराबाहेर पडतात. आज तरी आपल्याला लस मिळेल अशी भाबडी आशा ठेवत ग्रामीण रुग्णालयाच्या दारात बसून लसीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत बसतात. सकाळी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आल्यानंतर उपाशीपोटी बसलेल्या ज्येष्ठांना सांगितले जाते की, आज कोव्हॅक्सिन किंवा कोविशील्ड आलेले नाही. केव्हा येईल याची विचारणा केल्यास माहिती नसल्याचे सांगितले जाते. तर इतर तालुक्यात कोव्हॅक्सिनचे डोस मिळत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. ज्यादिवशी कोव्हॅक्सिन व कोविशील्ड लस असते तेव्हा क्रमांकाप्रमाणे टोकन दिले जाते. त्यामुळे गर्दी होत नाही. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे असे नियोजन ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आलेले आहे.

माझे वय 61 वर्षे आहे. पाच ते सहा वेळा ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी गेलो. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन 45 पेक्षाही जास्त दिवस झाले आहेत तरी दुसरा डोस मिळत नाही. डोस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. सतत हेलपाटे मारणे आम्हाला शक्य होत नाही.
– दादासाहेब गाढवे (ज्येष्ठ नागरिक, राहाता)

कोव्हॅक्सिन व कोविशील्ड गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध होत नाहीये. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने मानसिक त्रास होत आहे. लस तत्काळ उपलब्ध करून द्यावी.
– हेमंत सदाफळ (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राहाता)
