निष्क्रीय पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार का? राहुरीकरांचा सवाल; वाढत्या गुन्हेगारीसह आता तुरुंगही असुरक्षित
नायक वृत्तसेवा, राहुरी
गेल्या काही महिन्यांपासून चोर्या, घरफोड्या, अपहरण, हाणामार्या आणि अवैध व्यवसायांमुळे चर्चेत असलेल्या राहुरी शहरात आज पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. येथील कारागृहात संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कैद असलेली सागर भांड टोळी चक्क कारागृहाचे गज कापून पसार झाली, अर्थात टोळीच्या सूत्रधारासह दोघांना पुन्हा पकडण्यात आले असले तरीही उर्वरीत तिघांनी पोलिसांच्या हातावर तुर्या ठेवल्या आहेत. या घटनेने राहुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे गुन्हेगारांसह आपल्याच कर्मचार्यांवर वचक निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. राहुरी पोलिसांची लक्तरे उधडणार्या या घटनेनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील आता पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार की पुन्हा एकदा कर्मचार्यांचाच बळी दिला जाणार अशी चर्चाही आता राहुरीत सुरु झाली असून राहुरीतील गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी खमक्या अधिकार्याची मागणी जोर धरु लागली आहे.
मागील काही महिन्यात राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दित गुन्हेगारी घटनांनी अक्षरशः उच्छाद घातला आहे. सतत होणार्या चोर्या आणि घरफोड्यांच्या प्रकाराने राहुरीकर नागरिक हैराण झाले असून व्यापारी वर्गाने वारंवार पोलिसांना भेटून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही अशा घटनांमध्ये कोठेही घट झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे चोरटे पोलिसांपेक्षा अधिक प्रबळ झाल्याचे चित्र सध्या राहुरीत दिसत आहे. या सर्व घडामोडीत आता तुरुंगातील कुख्यात गुन्हेगारांच्या पलायनाची भर पडली असून या घटनेतून राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची निष्क्रीयता अगदी ठळकपणे समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणणार्या सागर भांड टोळीविरोधात कठोर कारवाई करतांना टोळीच्या सूत्रधारासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या टोळीतील पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने उपअधीक्षक मिटके यांच्या अहवालानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून भांड टोळीचा सूत्रधार सागर अण्णासाहेब भांड (वय 25, रा.ढवणवस्ती, नगर. ह.मु.शिरुर जि.पुणे), किरण अर्जुन आजबे (वय 26, रा.भिंगार, नगर), नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22, रा.नेवासा), रवी पोपट लोंढे (वय 22, रा.घोडेगाव) व जालिंदर मच्छिंद्र सगरगीळे (वय 25, रा.टाकळीमियाँ) हे गुन्हेगार राहुरीच्या कारागृहात कैद होते.
जुनाट पद्धतीच्या येथील कारागृहाच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून आज पहाटेच्या सुमारास या टोळीच्या सूत्रधारासह पाच जणांनी तुरुंगातून पळ काढला. सदरची बाब लक्षात येताच झोप उडालेल्या राहुरी पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करुन त्यांचा शोध सुरु केला. या दरम्यान टोळीचा सूत्रधार सागर भांड आणि किरण आजबे हे दोघे राहुरी स्टेशनजवळ दिसताच पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यांना पकडले. मात्र उर्वरीत तिघे पोलिसांच्या हातावर तुर्या ठेवण्यात यशस्वी ठरले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी राहुरीत धाव घेतली. सध्या स्थानिक गुन्हे शाखेकडून पळून गेलेल्या आरोपींचा माग काढला जात आहे.
कारागृहाचे कापलेले गज पाहता हे काम एका दिवसात झाले यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गज कापण्याचे काम सुरु होते असे म्हणण्यास मोठा वाव आहे. मग इतक्या दिवस गज कापण्याचे काम सुरु असतांना पोलीस निरीक्षकांसह कारागृह रक्षकांच्या ही गोष्ट लक्षात कशी आली नाही. गज कापण्यासाठी लागणारे हेक्सा ब्लेड आरोपींपर्यंत कसे व कोणी पोहोचवले? ते पोहोचवण्यात कारागृहाच्या बंदोबस्तावरील रक्षकांचाच तर हात नाही ना? असे अनेक प्रश्न यातून समोर आले आहेत. सर्वात महत्त्वाचे या घटनेमागे पोलीस निरीक्षकांची निष्क्रीयताच अधिक ठळकपणे समोर आली असून राहुरीतील वाढत्या गुन्हेगारीलाही ती पोषक ठरली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची येथून बदली करावी व त्यांच्या जागी नंदकुमार दुधाळ सारख्या खमक्या अधिकार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.