राहुरीत अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला!

नायक वृत्तसेवा, राहुरी
एका अल्पवयीन मुलीला अज्ञात महिला व रिक्षा चालकाकडून दमबाजी करून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना राहुरी शहरात सोमवारी (ता.1) घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील एका व्यापार्‍याची अल्पवयीन मुलगी राहुरी कारखाना बारावीचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर ती एका खाजगी रिक्षाने राहुरीकडे येण्यास निघाली असता रिक्षाचालक व आणखी एक अनोळखी महिला रिक्षात होती. महाविद्यालयाजवळ आल्यावर रिक्षा आतील रस्त्याने घेतली. त्यावर ती मुलगी ओरडू लागली असता अनोळखी महिला व रिक्षा चालकाने दमबाजी करत मुलीला गप्प बसण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेतच रिक्षा हळूच होता तिने रिक्षातून उडी मारली व तेथेच उपस्थित असलेले संकेत तनपुरे व त्याच्या मित्रांना घडलेली हकीगत सांगितली. त्यांनी तिच्या घरच्याशी संपर्क साधून सुखरूपपणे घरपोहोच केले. त्यानंतर ही घटना वंचित बहुजन आघाडीचे पिंटू साळवे यांना समजताच त्या रिक्षाचा व महिलेचा शोध घेतला असता ती महिला बस स्थानकाजवळ आढळून आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता पोलीस कर्मचारी संजय जाधव, भगवान थोरात व महिला पोलीस राधिका खुळे यांनी घटनास्थळी दाखल होत ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता ती महिला संगमनेर येथील असून राहुरी येथे एका अश्विनी नामक महिलेकडे आल्याचे सांगितले. सदर अश्विनी नामक महिला ही मुंजाबानगर परिसरात राहत असून तिला घरी शोधण्यासाठी पोलीस पथक गेले असता तिच्या घराला कुलूप दिसून आले. तिला शोधण्यासाठी पथक बस स्थानकासमोरील ऐश्वर्या लॉज येथे गेले असता तिथेही ती आढळून आली नाही. परंतु, तीन महिला व दोन पुरूष आढळले. त्यांना चौकशीकामी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांनी ठाण्यात आणले. या घटनेतनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन महिला देह व्यापार करत असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. तर रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलिसांत अल्पवयीन मुलीची तक्रार नोंदवण्याचे काम चालू होते.

Visits: 12 Today: 1 Total: 99046

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *