राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या तालुक्यात गावोगावी लसीकरण मोहीम मंगळवारी सात गावांमध्ये प्रत्येकी पन्नास व्यक्तींचे केले लसीकरण

नायक वृत्तसेवा, राहुरी
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून मंगळवारपासून (ता.11) गावोगावी कोरोना लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सात गावांत प्रत्येकी 50 जणांना लस देण्यात आली. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व तीन ग्रामीण रुग्णालयांत नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

राज्यमंत्री तनपुरे यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन, लसीकरणाचा आढावा घेतला. प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ.दीपाली गायकवाड आदी बैठकीस उपस्थित होते.

गावोगावी लसीकरण मोहिमेत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार गावे निवडून, प्रत्येक गावात लसीकरण केले जाणार आहे. आज सडे, खडांबे खुर्द, मुसळवाडी, तांभेरे, चांदेगाव व मानोरी येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील प्रभागनिहाय मतदार यादीतील क्रमानुसार 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीचा पहिला डोस देण्यात आला. प्रत्येक गावात 50 जणांना लस देण्यात आली.

तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व तीन ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी 70 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. पहिला डोस घेतलेल्या तारखेच्या प्राधान्यक्रमानुसार नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी टळल्याने शांततेत लसीकरण मोहीम पार पडली.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल!
राहुरीच्या लसीकरण मोहिमेची जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दखल घेतली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना, राहुरीत ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आले, त्याप्रमाणे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

Visits: 184 Today: 1 Total: 1869384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *