दोन तासांच्या पावसाने पालिकेचे काढले धिंदवडे

दोन तासांच्या पावसाने पालिकेचे काढले धिंदवडे
चंदनापुरी घाटही दोन तास करावा लागला वाहतुकीसाठी बंद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून लाभक्षेत्रात दडी मारणार्‍या वरुणराजाने गुरुवारी सायंकाळी संगमनेर व अकोल्यात मुसळधार बरसतांना नागरिकांची धावपळ उडवली. संगमनेरात तर प्रत्येक रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आल्यासारखी स्थिती होती. तालुक्याच्या उत्तर-दक्षिणभागाच्या पट्ट्यात कोसळलेल्या या जोरदार सरींनी चंदनापूरी घाटही काही काळासाठी बंद केला होता. तर शहरातील नवीन नगर रस्ता आणि बसस्थानकाच्या परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने पालिकेच्या ‘नालेसफाई’ योजनेचे अक्षरशः धिंदवडे काढले.


गुरुवारी दिवसभर संगमनेरात निरभ्र आकाश आणि कडाक्याचे ऊन पडले होते. दिवसभरातील वातावरणावरुन संगमनेरात पावसाची कोणतीही शक्यता दिसत नसताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची दाटी झाली आणि सुमारे दोन तास धोऽधो करीत पर्जन्यधारा कोसळल्या. संगमनेरात अवघ्या दोन तासांत 54 मिलीमीटर पाऊस झाल्याने रस्त्यारस्त्यावर आणि गल्लीबोळातील पाण्याच्या प्रवाहांना अक्षरशः ओढ्याचे स्वरुप आले होते.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अशोक चौकासह अशी पावसात नेहमीच हाल होणार्‍या नवीन नगर रस्ता आणि बसस्थानकाच्या परिसरात या पावसाने दाणादाण उडवली. अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या रहदारीच्या समजल्या जाणार्‍या या दोन्ही रस्त्यावर रात्री नऊ वाजेपर्यंत गुडघाभर पाणी वाहत होते. बसस्थानकाच्या समोरील पालिकेच्या बेकायदा व्यापारी संकुलातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, मात्र हा प्रकार नेहमीचाच असल्याने तेथील व्यापारी सावध असल्याने आर्थिक हानी टळली.


गुरुवारी शहरासह तालुक्याच्या उत्तर-दक्षिण पट्ट्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. चंदनापुरी भागात पावसाचा जोर अधिक असल्याने घाटमाथ्यावरुन अनेक जलप्रपात जिवंत झाले. घाटाच्या रस्त्यावरुनही गुडघ्यापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहू लागल्याने अपघाताची शक्यता गृहीत धरुन सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखली होती. त्यामुळे काहीकाळ महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


काल सायंकाळी झालेला पाऊस पुढील प्रमाणे कंसात आजवरचा एकूण अकोले 62 मिलीमीटर (1012 मि.मी.), संगमनेर 54 मिलीमीटर (440 मि.मी.), ओझर 18 मिलीमीटर (717 मि.मी.), आश्वी 12 मिलीमीटर (816 मि.मी.) व लोणी 10 मिलीमीटर (511 मि.मी.).

Visits: 140 Today: 1 Total: 1872146

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *