चैतन्यपूरच्या सरपंचांसह उपोषणकर्ते तेरा मागण्यांवर ठाम! महावितरणकडून दखल; अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती


नायक वृत्तसेवा, अकोले
महावितरणच्या गलथान कारभाराला वैतागून चैतन्यपूरचे (ता. अकोले) सरपंच नितीन डुंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवारपासून (ता.22) आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दुसर्‍या दिवशी दखल घेऊन राजूरचे अधिकारी विवेक मेवाडे आणि ब्राह्मणवाडा कक्षचे घोलप यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत अधिकार्‍यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चैतन्यपूर गावातील पथदिव्यांची वीज महावितरणने खंडीत केली आहे. याचबरोबर शेतीपंपांच्या विजेबाबतही अनेक तक्रारी आहे. याला जनता पुरती वैतागून गेली आहे. त्यामुळे मेवाडे आणि घोलप या दोन अधिकार्‍यांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हे दोन्ही अधिकारी संगनमताने ग्राहकांकडून पैसे उकळतात. त्यांची विभागीय व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करुन त्यांना तत्काळ निलंबित करावे. या मागणीसह विविध तेरा मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी आमदार डॉ. किरण लहामटे हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच दुसर्‍या दिवशी महावितरणच्या अधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ‘त्या’ दोन अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी महावितरणकडून त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत कार्यकारी अभियंता एल. एम. काकडे, उपमुख्य औद्योगिक अधिकारी नाशिक परिमंडळ प्रमोदराजे भोसले आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. एस. खराटे यांचा समितीत सहभाग करण्यात आला आहे. आता चौकशीतून काय पुढे येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Visits: 180 Today: 1 Total: 1776011

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *