अनोखे दातृत्व! कर्करोगग्रस्तांसाठी केस केले दान कर्तव्यम फाउंडेशनचा उपक्रम; पूनम ओहरांचे होतेय कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको. असं असताना देखील संगमनेर येथील पूनम तुषार ओहरा यांनी आपले केस कर्करोगग्रस्तांसाठी दान केले. कर्तव्यम फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

पूनम ओहरा या कर्तव्यम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तुषार शरदकुमार ओहरा यांच्या धर्मपत्नी आहेत. त्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा देत आहे. त्यांना नेहमीच सामजिक कार्य करण्याची आवड आहे. याचबरोबर पूनम या सोशल मीडियावर सोशल अॅक्टिव्हिटीचे व्हिडीओ बघत असताना त्यांना एक व्हिडीओ दिसला की, ज्यात एक मुलगी आपले संपूर्ण केस हे कर्करोग पीडितेसाठी दान करते. त्यात त्या संस्थेचे नाव सुद्धा होते. त्यावेळी पूनम यांनी त्यांची सर्व माहिती काढली व त्यांनी ठरविले की आपन सुद्धा कर्करोग पीडितांना फूल न फुलाची पाकळी अशी मदत करु. त्यांनी यानंतर या संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधला असता. या आजारामुळे ज्या व्यक्तींचे केस जातात त्यांना कृत्रिम केस लावले जाऊ शकतात, त्यासाठी केस दान केले जाऊ शकतात, असं त्यांना कळालं. ही माहिती मिळताच पूनम यांनी आपल्या डोक्यावरील केस दान करण्याचा निर्णय घेतला.

खरेतर ज्या वयात मुली आपलं सौंदर्य जपतात, त्याच वयात त्यांनी आपल्या सौंदर्याचा विचार न करता आपले केस दान केले. त्यांच्या या निर्णयाचं आता सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. याप्रमाणेच इतरांनी देखील असे पाऊल टाकावे, असे आवाहनही फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना माझ्या मनात नेहमीच होती. एके दिवशी सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असताना कर्करोग्रस्त रुग्णांचे हाल मला बघावले गेले नाही. त्यामुळे माझ्या लग्नाच्या दुसर्या वाढदिवसानिमित्त मी कर्करोगग्रस्तांना माझे केस दान केले आहे.
– पूनम तुषार ओहरा, संगमनेर

कर्तव्यम फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्य करत असते. माझी पत्नी पूनम हिने कर्करोगग्रस्तांना केस दान करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे यापुढे आता कर्करोगग्रस्तांसाठी कर्तव्य फाउंडेशन अधिक ऊर्जेने काम करेल.
– तुषार ओहरा, संस्थापक – कर्तव्यम फाउंडेशन, संगमनेर.
