तुम्ही बाळासाहेबांचे शिष्य आहात, संघ परिवारात या! आमदार राजासिंह यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन
नायक वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील आमदार टी. राजासिंह यांनी संघ परिवारात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले. अहमदनगरमध्ये आयोजित सभेत आमदार राजासिंह बोलत होते. ‘तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहात. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला कसे हिंदू व्हायचे आहे? देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडा, धर्म प्रचारासाठी विश्व हिंदू परिषदेत या किंवा देशद्रोही, आंतकवादी, गो-हत्या करणार्यांना ठोकायचे असेल तर बजरंग दलात या’, असे सांगत राजासिंह यांनी शिंदे यांना संघ परिवारात सहभागी होण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे झाल्यानिमित्त आमदार राजासिंह यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत. सोमवारी (ता.१६) नगर शहरामध्येही त्यांची सभा झाली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यावतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला एमआयएमकडून आधीच विरोध झाला होता. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. सभेत टी. राजासिंह यांचे नेहमीप्रमाणे जहाल भाषण झाले. अन्य विषयांवर बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच संघ परिवारात येण्याची साद घातल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
सभेसाठी युवकांची गर्दी मोठी होती. त्यांना प्रश्न विचारून, प्रोत्साहन देत राजासिंह आपले मुद्दे मांडत होते. त्यामुळे प्रेक्षकांमधून जल्लोष आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. राजासिंह म्हणाले, ‘आपल्याकडे असा अनुभव आहे की, हिंदू संघटित झाल्यावर इतिहास रचतो. भारत आता एक हिंदूराष्ट्र घोषित झाले पाहिजे. याची घोषणा २०२६ च्या अगोदर होईल. आयोध्येत भव्य राम मंदिर साकारले जात आहे. काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० वे कलम हटविण्यात आले. आता काशी, मथुरामध्येही भव्य मंदिर उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबर बजरंग दल देशभर काम करत आहे. यापुढे लव्ह जिहाद खपवून घेणार नाही. गो-हत्या करणार्यांना उलटे टांगले जाईल,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजासिंह म्हणाले, ‘प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफलखानाची कबर जशी उध्वस्त केली, त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे असलेली एकाची कबर उध्वस्त करायची आहे. माझे आवाहन आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उखडून टाकावी. तसे झाले तर या लढाईत कोट्यवधी हिंदू तुमच्यासोबत येतील. जे अफलखानांचे वंशज आहेत, ते पाठीत खंजीर खुपसणारच. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांनी वेदना देत मारले, त्याची कबर महाराष्ट्राच्या जमिनीवर नकोच. ‘व्होट बँके’चा विचार न करता हा निर्णय घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.