संगमनेरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला स्वातंत्र्यदिनाचा विसर! ‘हर घर तिरंगा’ अभियानाला हरताळ; राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी कोणीच फिरकले नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरात भारतीय स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असतांना जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेतून मात्र अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या घरावर अथवा व्यावसायिक ठिकाणांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची मुभा देण्यात आली आहे. यातून मनामनात राष्ट्रभावना प्रज्ज्वलित व्हावी असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामचुकार संगमनेर शाखा व्यवस्थापकांनी शासनाच्या या उद्देशालाच हरताळ फासला असून स्वातंत्र्यदिनी बँकेचा कर्मचारी वर्ग सुट्टी भोगण्यातच मश्गुल असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करुन उभ्या राहीलेल्या या संस्थेच्या इमारतीवरील ध्वजस्तंभ स्वातंत्र्यदिनीही ध्वजाशिवाय उभा असल्याचे दिसून आले. याबाबत संगमनेरच्या प्रांताधिकार्यांसह तहसीलदारांनाही सदरची बाब निदर्शनास आणून देण्यात आली असून त्यांच्याकडून काय कारवाई होते याबाबत उत्सुकता आहे.
देशातील तरुण पिढीच्या मनात देशभक्तीची भावना रुजवणे आणि देशातील लहान मुले, किशोरवयीन आणि तरुणांना येत्या दीर्घ काळासाठी देशाच्या विकास, सुरक्षा आणि भविष्याशी जोडण्याचे संस्कार देणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र सरकार गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविते. या अभियानात अधिकाधिक भारतीय नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी शासनाने ध्वज संहितेतही बदल केले असून त्यातून राष्ट्रध्वजाच्या किंमतीही कमी झाल्याने राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने देशभरातील कोट्यवधी नागरिक या मोहीमेचा भाग बनले आहेत. जेव्हा सामान्य नागरिक या अभियानाशी जोडला गेला आहे, तेव्हा शासकीय, निमशासकीय आणि सहकारी आस्थापनांचा यात आपोआपच सहभाग गृहीत धरला गेला आहे, नव्हे ही तर त्यांची जबाबदारीच म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात तर संगमनेर चळवळींचे केंद्र राहीले आहे. 1905 साली ब्रिटीश सरकारने पश्चिम बंगालची फाळणी करुन देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करीत बंगाली क्रांतिकारक बिपीनचंद्र पाल, पंजाबचे क्रांतिकारक लाला लजपत राय व महाराष्ट्राचे क्रांतिकारक बाळ गंगाधर टिळक यांनी या फाळणी विरोधात ‘वंगभंग चळवळ’ सुरु केली. संगमनेरातील माधवराव परशरामी, केशव परशरामी, वैजीनाथ शास्त्री रानडे यांच्यासारख्या असंख्य तरुणांनी या आंदोलनाच्या यज्ञात समिधा टाकल्या. त्याने प्रभावित होवून लोकमान्य टिळकांनी 19 मे 1917 रोजी संगमनेरात येवून या भूमीला स्वातंत्र्य लढ्याचे बळ दिले. त्या नंतरच्या काळात झालेले खादी व स्वदेशी आंदोलन, जंगल सत्याग्रह, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह आणि 1942 ची चलेजाव चळवळ अशा विविध आंदोलनात संगमनेरचे नाव त्याकाळी आघाडीवर होते.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला संगमनेरातून मिळणारे बळ विचारात घेवून लोकमान्य टिळकांनंतर 21 मे 1921 साली महात्मा गांधीही संगमनेरात आले होते. त्यावेळी बाजारपेठेत त्यांची जाहीर सभाही झाली आणि संगमनेरकरांनी त्यांना त्यावेळी मानपत्र देवून त्यांचा गौरवही केला. यावेळी स्वातंत्र्य लढ्यासाठी जमा करण्यात आलेल्या निधीलाही संगमनेरकरांनी हातभार लावतांना 1100 रुपये जमा केले होते व ते गांधीजींच्या हाती सोपविले होते. पुढे 15 फेब्रुवारी 1937 साली पंडित जवाहरलाल नेहरु आणि त्यानंतर घटनाकार डॉ.भिमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांनीही संगमनेरला भेट देवून येथून सुरु असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ देण्याचे काम केले. त्यावेळच्या चळवळींमध्ये संगमनेर नगरपालिकेचे पटांगण आणि त्या भोवतीचा परिसर आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते.
स्वातंत्र्यलढ्यातील संगमनेरचे योगदान विचारात घेवून स्वातंत्र्योत्तर भारतात पालिकेसमोरील चौकात लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. काही वर्षापूर्वी याच चौकात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोट्यवधी रुपयांची जागा घेवून तेथे अलिशान शाखाही सुरु केली. या बँकेचे कामकाज येथील नवीन इमारतीत सुरु झाल्यानंतर मंगळवारी देशाचा पहिलाच स्वातंत्र्य दिन होता. त्याचे निमित्त साधून खरेतर बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करणे अपेक्षीत होते. मात्र शेतकर्यांची पिळवणूक करताकरता मनाचेच मातेरे झालेल्या येथील बँकाधिकारी आणि कर्मचार्यांच्या भावनाच मृत पावल्याने शनिवार, रविवार आणि नंतर चुकून आलेला सोमवार वगळता लागोपाठ मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये या सर्वांना देशाचा स्वातंत्र्यदिनाचाच विसर पडला.
विशेष म्हणजे सदरील बँकेची इमारत उभी राहील्यानंतर इमारतीच्या शिर्षभागी ध्वजारोहणासाठी ध्वजस्तंभही उभारण्यात आला आहे. मात्र मंगळवारी देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाही बँकेच्या छतावरील स्तंभावर राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी कोणीही आले नाही. त्याचवेळी याच बँकेच्या अगदी समोरच असलेल्या चौंडेश्वरी पतसंस्थेसह आसपासच्या नागरिकांनीही आपल्या घरांवर देशाचा राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्राप्रति आपल्या भावना व्यक्त केल्याचे दिसून येत होते. देशाच्या स्वातंत्र्यदिनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा बोडखा ध्वजस्तंभ पाहून परिसरातील नागरिकांसह पाहणार्या प्रत्येकाने संताप व्यक्त केला असून संबंधित बँकेच्या शाखाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत काही जागृत नारिकांनी सदरील बँकेच्या रिकाम्या ध्वजस्तंभाचे फोटो आणि व्हिडिओ काढून संगमनेरच्या प्रांताधिकार्यांसह तहसीलदारांनाही पाठविले असून त्यांच्याकडून योग्य त्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासकीय, निमशासकीय, सहकारी व खासगी आस्थापनांनी देशाचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करावा व त्या दिवशी नियमानुसार आपल्या कार्यालयांच्या शिरोभागी ध्वसंहितेचे पालन करुन राष्ट्रध्वज फडकवावा असे संकेत आहेत. मागील दोन वर्षांपासून तर केंद्र सरकारने प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावला जावा यासाठी या दोन्ही राष्ट्रीय उत्सवांचे स्वरुप अधिक व्यापक केले आहे. मात्र संगमनेरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामचुकार अधिकार्यांनी या मोहीमेलाच हरताळ फासला असून संगमनेरच्या तहसीलदारांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेवून संबंधितांवर योग्य त्या कारवाईची शिफारस करण्याची सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे.