जुना एकल घाट बनला कचर्याचे ठिकाण! पर्यावरणप्रेमींकडून कडक कारवाईची मागणी
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली येथील जुन्या एकल घाटाचा उपयोग सध्या मेलेली जनावरे आणून टाकण्यासाठी होत आहे. तर घाटात ठिकठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला असल्याने पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. यामुळे एकल घाटाचा उपयोग हा कचरा टाकण्यासाठीच होतोय का? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे.

पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून जुना एकल घाट ओस पडला आहे. थोड्याफार प्रमाणातच वाहने ये-जा करतात. वर्दळ कमी असल्याने मद्यपी येथे येऊन मनमुराद दारु रिचवून येथेच बाटल्या टाकतात. तसेच अनेक खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कागदही येथेच अस्ताव्यस्त फेकून देतात. याचबरोबर मेलेली जनावरे देखील आणून टाकतात. यामुळे मोठी दुर्गंधी पसरली असून, पशु-पक्ष्यांनाही धोका पोहोचत आहे.

पठारभाग हा डोंगरदर्यांत वसलेला असल्याने मोठी वनसंपदा लाभलेली आहे. बिबट्यांसह इतर जंगली श्वापदांचा वावरही आहे. यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या एकल घाटातील कचर्याच्या साम्राज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून, अस्वच्छता करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
