भ्रष्टाचाराचे आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ः देशमुख अगस्ति कारखान्याच्या गैरकारभारावरुन सत्ताधारी व विरोधकांत रंगला कलगीतुरा

नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेली पाच ते सहा महिन्यांपासून कारखान्याच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी माझ्या प्रशासकीय सेवेतील कामगिरीवर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करून तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधिताविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत देशमुख यांनी बुधवारी (ता.14) सायंकाळी अकोलेतील विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले, 31 मार्च रोजी अगस्ति साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी तुमच्या भ्रष्टाचाराची फाईलच आमच्याकडे आहे असे वक्तव्य केले. तर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी एका यू-ट्युब वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन माझ्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु दुसर्याच दिवशी थोरल्या बंधूचे निधन झाले. त्यानंतर दुखवट्यातून बाहेर पडल्यानंतर बुधवारी अकोले पोलीस ठाण्यात मानहानीबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे माझ्याविरोधात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत. तसेच अगस्तितील गैरकारभारासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत समोरासमोर बसून उत्तरे द्यावीत असे खुले आव्हानच त्यांनी कारखान्याच्या पदाधिकार्यांना दिले आहे.

अगस्ति कारखान्यावरील कर्जाबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने अस्वस्थ होऊन माझ्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करून वेळ मारून नेण्याचा आणि कारखान्याच्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अजूनही वेळ गेली नसून आपण जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कारखान्याच्या पदाधिकार्यांनी द्यावीत. अन्यथा आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
