लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे ः कन्हैयाकुमार

लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे ः कन्हैयाकुमार
जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये लोकशाही विषयावर संवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत हा विविध संस्कृती, जात-धर्म, वेश, भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी लोकशाहीने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे, असे आवाहन कॉम्रेड कन्हैयाकुमार यांनी केले आहे.


जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित लोकशाही विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ अ‍ॅड.असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरिकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदिंनी सहभाग घेतला. यावेळी अमृतवाहिनीच्या द्रोणागिरीतील मुख्य व्यासपीठावर जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उत्कर्षा रुपवते, समन्वयक संदीप खताळ, उत्तमर जगधने, अशोक खैरनार, डॉ.सूरज गवांदे, किशोर गोरे, प्रदीप नेहे आदी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना कन्हैयाकुमार म्हणाले, भारताला सत्य अहिंसेची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधींनी या तत्त्वातून देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. प्रत्येकाला राज्यघटनेने समानतेचा अधिकार दिला. लोकशाहीमुळे देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली असून सध्या ही लोकशाही काही शक्ती मोडून त्याठिकाणी हुकूमशाही लादू पाहत आहे. लोकशाहीचे स्तंभ केंद्रीय सत्तेचा मर्जीनुसार काम करत आहे हे चिंताजनक आहे. प्रशासन राज्यघटनेला बांधिल असले पाहिजे. मात्र ते सत्ताधार्‍यांची मनधरणी करत आहेत. माध्यमे फक्त टीआरपीच्या मागे धावत आहेत. त्यामुळे माध्यमांवरील विश्वासही शंकास्पद ठरला आहे. देशांमध्ये हाथरसची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तेथे लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवली गेली. गोरगरिबांना आपल्या व्यथा मांडता येत नाहीत. अशा परिस्थितीत विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे. मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात लोकशाही वाढली पाहिजे. गल्ली ते संसदेपर्यंत लोकशाहीची मूल्ये आपण प्रत्येकाने जगली तरच यापुढील काळामध्ये लोकशाही समृद्ध ठेवू शकतो. प्रत्येक नागरिकाने लोकशाहीचे मूल्य सत्य मार्गाने जपत काम करावे असे आवाहन त्यांनी केले.


महसूल मंत्री थोरात म्हणाले, जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरोगामी विचार व भारतीय संस्कृतीचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. प्रास्ताविक जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.तांबे यांनी केले. सूत्रसंचालन उत्कर्षा रूपवते व अ‍ॅड. गवांदे यांनी केले तर अशोक खैरनार व संदीप खताळ यांनी आभार मानले.

Visits: 85 Today: 2 Total: 1101651

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *