‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणार्या तरुणावर अत्याचाराचा गुन्हा! वर्षभर एकत्रित राहिल्यानंतर अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकमेकांच्या प्रेमात आकांत डूंबून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये वर्षभर राहणार्या महिलेने आपल्या जोडीदाराविरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल केली आहे. या वृत्ताने विवाहित असूनही आपले घर सोडून ‘लिव्ह इन’च्या गोंडस नावाने प्रेमाचा इमला उभ्या करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दाखल तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संशयीत आरोपी नीलेश देशमुख याला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली असून त्याला आज न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुंजाळवाडी शिवारात राहणार्या नीलेश नंदकुमार देशमुख या विवाहित तरुणाचे खांडगाव शिवारातील गणेशनगर परिसरात राहणार्या 28 वर्षीय विवाहित तरुणीसोबत सूत जुळले. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकांत डुंबले व त्यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी 12 ऑगस्टपासून ते कालपर्यंत (ता.18) वर्षभर ते दोघेही एकत्रित राहत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले.
मात्र मंगळवारी (ता.18) रात्री त्या महिलेने तडक शहर पोलीस ठाणे जवळ करीत संबंधित तरुणाने गेल्या वर्षभरात आपल्याला विविध प्रलोभण दाखवित व खोटी आश्वासने देत वारंवार आपल्या मनाविरुद्ध शारीरिक अत्याचार केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन ‘तु माझं काहीही वाकडं करु शकतं नाही’ असे म्हणतं तिला हाताने मारहाण करीत ढकलून दिले अशा आशयाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशीराने संशयीत आरोपी नीलेश देशमुख याच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3(2)(व्ही), 3(1)(डब्ल्यू)(।)(॥) सह भादंवि कलम 376, 376(2)(एन), 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत आरोपीला रात्रीच गजाआड केले. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
संबंधित दोघेही विवाहित असून त्यातील महिला गेल्या वर्षभरापूर्वीपासून आपल्या पतीसोबत राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान तिचे सूत संशयीत आरोपीशी जुळले. त्यातूनच त्या दोघांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित तरुणाने आपल्या पत्नीचे घर सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या गोंडस नावाखाली त्या विवाहित तरुणीसोबत अनैतिक संसार थाटला. त्यातूनच त्याने वेळोवेळी प्रलोभणे देत संबंधित महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्या दरम्यान तिला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
या वृत्तानंतर खांडगाव शिवारातील गणेशनगर परिसरासह गुंजाळवाडी शिवारातील विडी कामगार सोसायटी समोरील कृष्णा वसाहतीत खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या वृत्तानेे आपले नांदते घर सोडून प्रेमाच्या आणाभाका घेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या गोंडस नावाने एकत्रित राहणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित दोघेही विवाहित आहेत. यातील महिलेला तिचा पती नांदवत नव्हता, मात्र तरुणाचा संसार सुखाने सुरु होता अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यातूनच या दोघांचे सूत जुळले आणि त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी 12 ऑगस्टपासून कालच्या 18 ऑगस्टपर्यंत ते दोघेही एकत्रित राहत होते. मात्र या दरम्यान त्या तरुणाने आपल्यावर शारीरिक अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद खुद्द त्या महिलेनेच दाखल केल्याने संपूर्ण तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.