खासदार सदाशिव लोखंडेंना आश्वासनाचा विसर ः डावरे कोरोना काळात उंबरगावच्या उपचार केंद्रातून लाभ देण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरनजीक उंबरगाव येथे वैद्यकीय सेवा केंद्र उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात खासदार लोखंडे यांनी त्याचा उल्लेख केला होता. या केंद्रातून तालुक्यातील जनतेला वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्याचे त्यांनी जाहीरपणे आश्वासन दिले होते. त्याची आठवण डावरे यांनी करून दिली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत खासदार लोखंडे हे जनतेला दिलासा देणार का, असा प्रश्न डावरे यांनी उपस्थित केला आहे.
बेलापूर शहरामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे उंबरगाव येथील या उपचार केंद्राचा लाभ स्थानिकांना द्यावा. लोखंडे यांचे पुत्र चेतन हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभही जनतेला मिळेल. त्यामुळे लोखंडे यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आता वेळ आली आहे, असे डावरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या निधीतून 30 लाख रुपये खर्च करुन ग्रामीण रुग्णालय येथे 50 बेड्सचे ऑक्सिजन सुविधेचे उपचार केंद्र उभे केले. खासदार लोखंडे यांनी मात्र कोणताही निधी तालुक्यात खर्च केलेला नाही. कोरोनाच्या मागील लाटेतही त्यांच्याकडून ठोस मदत मिळू शकली नाही. त्यामुळे खासदार लोखंडे कधी दिलासा देणार असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.