भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व देत कोरोना नियमांचे पालन करा ः थोरात कोरोना आढावा बैठक; प्रशासनाला विविध उपायांबाबत केल्या सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या दुसर्या लाटेत वाढणारी रुग्णसंख्या ही अत्यंत चिंताजनक आहे. या संकटातून स्वत: व स्वत:च्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. तसेच भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्व देत मास्क वापरणेसह शासनाच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे, असे अवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले असून गावोगावची रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशा सूचनाही दिल्या.

संगमनेरातील नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, कृषी विभागाचे सुधाकर बोराळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकामचे आर.आर.पाटील, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, शासनाने कोरोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्याला नागरिकांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. काही ठिकाणी वाढणारी मृत्यूसंख्या ही अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत प्रशासनाने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाला घाबरून जाऊ नका. मात्र निष्काळजीपणा सुद्धा करू नका. प्रशासन आपल्या पाठिशी आहे. गावोगावी कोरोना दक्षता समिती स्थापन करून प्रत्येकाने आपल्या गावाच्या व विभागाची काळजी घ्यावी आणि आपल्या परिसरात कोरोना वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच एका रुग्णापाठोपाठ वीस जणांची तपासणी करताना ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करा, लसीकरणाचा वेग वाढवा आणि उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी काम करावे अशा सूचनाही दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे म्हणाले, संगमनेरमध्ये वैद्यकीय सेवा चांगली असल्याने आसपासच्या सर्व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. तालुक्यातील व आलेल्या रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने संयम, शिस्त पाळावी असे आवाहन त्यांनी केले. तर शेवटी तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
