कोपरगावात प्रभागनिहाय ‘कोरोना सुरक्षा समिती’ स्थापन करणार! नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
जिल्ह्यात कोरोना विषाणूंनी अक्षरशः थैमान घातले आहे. रोज बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत भर पडून उच्चांक होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले असून विविध उपाययोजना करत आहे. कोपरगावातही कोरोनाची दुसरी लाट आल्याने रोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून बळीही जात आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागनिहाय ‘कोरोना सुरक्षा समिती’ स्थापन करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले की, कोपरगाव शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असून रुग्णसंख्या व मृत्यूचे मोठे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. याकामी नागरिकांचे देखील सहकार्य होणे अपेक्षित आहे. त्यासाठी उपाययोजना करणेकामी प्रभागनिहाय कोरोना सुरक्षा समिती स्थापन करण्यात आहे. यामध्ये प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील 4 नागरिकांचा समावेश असणार आहे. यामध्ये ज्या नागरिकांना स्वतःहून काम करायचे आहे, त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली नावे नगरसेवकांच्या माध्यमातून 12 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्याकडे द्यावीत असे आवाहन त्यांनी केले आहे.
या समितीने आपापल्या प्रभागातील कोरोनाबाधित रुग्णांची नावे, रुग्णांना उपचारासाठी भरती केलेले ठिकाण (दवाखाना/ कोविड सेंटर) त्यांचे संपर्कात येणार्यांची माहिती, कोरोना संबंधित लक्षणे आढळून येणार्या व्यक्तींची नावे इत्यादी माहिती कार्यालयात कळविणेची जबाबदारी पाडावी. याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी, शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असेही आवाहन शेवटी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.