जयहिंद-वनराईच्या माध्यमातून पाणलोट विकासकामांना अधिक गती ः थोरात पेमगिरीसह 15 गावांमध्ये आदर्श ग्राम अंतर्गत कामांना सुरुवात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातून सुरू केलेली दंडकारण्य अभियान ही चळवळ राज्याला दिशादर्शक ठरली आहे. असेच आदर्शवत काम राज्यभरात वनराईच्या माध्यमातून होत असून जयहिंद लोकचळवळीने दत्तक घेतलेली 15 गावे ही विविध विकासकामांमधून सुदृढ ग्राम होणार असून जयहिंद व वनराईच्या माध्यमातून पाणलोटाच्या कामाला अधिक गती मिळेल. असा विश्वास जयहिंद लोकचळवळीचे मार्गदर्शक तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
जयहिंद लोकचळवळ, क्रॉम्प्टन मुंबई, वनराई पुणे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या पेमगिरी गावात तसेच जयहिंद लोकचळवळीने दत्तक घेतलेल्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा, मिर्झापूर, नांदुरी दुमाला या गावांमध्ये पाणलोट विकासकामांचा शुभारंभ नुकताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पेमगिरी येथे पार पडला. यावेळी जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे, वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई संस्थेचे विश्वस्त सागर धारिया, अॅड. माधव कानवडे, मीरा शेटे, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, मिलिंद कालवडे, अर्चना बालोडे, पांडुरंग घुले, सोमनाथ गोडसे, रावसाहेब डुबे, शांताराम डुबे, मारुती कवडे, विलास कवडे, नानासाहेब कानवडे यांसह जयहिंदचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून आमदार डॉ. तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यामध्ये सुदृढ ग्राम हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये तालुक्यातील 15 गावांची निवड झाली आहे. वनराई व क्रॉम्प्टन ग्रुपच्या सहकार्याने पाच कोटींची कामे होणार असून पहिल्या टप्प्यात 70 टक्के निधी विविध गावांवर खर्च केला जाणार आहे. आदर्शगाव योजनेतून संगमनेर तालुक्यात अनेक कामे उभी राहिली असून पाणलोटाच्या माध्यमातून जलसंधारणाचे आणखी काम उभे राहणार आहे. स्व. मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली वनराई संस्थेने या क्षेत्रात राज्यभरात मोठे काम उभे केले आहे. तालुक्यात विविध गावांमध्ये त्यांच्याकडून होणार्या कामांमुळे पाणलोट कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात पाणलोटाचे मोठे काम उभे राहिले आहे. जलसंधारणातून या गावात तालुक्याने मोठी प्रगती साधली आहे. या तालुक्यातील 15 गावांमध्ये जयहिंदच्या सहकार्यातून काम करण्यास वनराई संस्थेत निश्चित आनंद होत आहे. पेमगिरी हा ऐतिहासिक भाग असून याठिकाणी जलसंधारणाच्या कामातून पुढील काही वर्षात मोठा बदल दिसेल. याप्रसंगी बाळासाहेब कानवडे, मीनानाथ शेळके, द्वारका डुबे, शिवाजी वलवे, संदीप गोपाळे, सखाराम शेरमाळे, सारंग पांडे, सौ. शेळके, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. आर. पाटील, निखील पापडेजा, विष्णू डुबे, भाऊराव कोल्हे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय डुबे व संदीप डुबे यांनी केले तर सोमनाथ गोडसे यांनी आभार मानले.