साईबाबांच्या शिर्डीत दहशतवादी मुक्कामी! शिर्डी पोलीस व नाशिक एटीएसने सापळा लावून केली अटक..


नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘सबका मालिक एक’ अशी समतेची शिकवण देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीतून अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाच्या वाहनाखाली आईडी स्फोटके ठेवण्यात आली होती. त्या कटाचा मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी चक्क शिर्डीत येवून लपल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शिर्डी पोलीस व नाशिकच्या एटीएस पथकाने शिर्डीतील एका लॉजवर छापा घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याचा ट्रांझीट रिमांड मंजूर केल्याने त्याला अमृतसर पोलीस आयुक्तालयाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या वृत्ताने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली. त्यानुसार पंजाबमधील दहशतवादी रजेंदरकुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी (रा.पट्टण तहसील, जि.तरणतारण, पंजाब) याच्यासह त्याचे साथीदार हरपालसिंग व फत्यादीपसिंग यांनी पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दिलबागसिंग यांच्या वाहनाखाली बॉम्ब ठेवून ते तिघेही पसार झाले होते. सदरील आरोपींनी पंजाबमधून दिल्लीमार्गे विमानाने मालदीवला पसार होण्याची योजना आखली होती. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांची कोविड चाचणी झालेली नसल्याने त्यांची विमानाची तिकीटे कन्फर्म होवू शकली नाहीत.


त्यामुळे रजेंदरकुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी हा दहशतवादी दिल्ली येथून मंगला एक्सप्रेसने नांदेडकडे रवाना झाला. मात्र सदरची रेल्वे नांदेडला न जाता मनमाडपर्यंतच धावल्याने तो मनमाडमध्ये उतरला व रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये मुक्कामी राहीला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तो मनमाडहून साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत पोहोचला. त्याने शिर्डीतील गंगा कॉन्टीनेंटल लॉजमध्ये मुक्कामही केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना वरीष्ठ पातळीवरुन याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिसांना सतर्क करुन काही वेळातच शिर्डीत दाखल होणार्‍या नाशिक एटीएससोबत समन्वय ठेवून कारवाईचे आदेश दिले.


त्यानुसार शिर्डीचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक निरीक्षक प्रताप गिरी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस शिपाई नितीन शेलार, नितीन सानप, अजय पंधारे व दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी संजय हराळे व रविंद्र महाले यांच्यासह प्राप्त माहितीचे विश्‍लेषण करुन योजना आखली. त्यानंतर या पथकाने शिर्डीतील ‘त्या’ लॉजमध्ये जावून तेथील रजीस्टर तपासले असता सदरील आरोपी लॉजमधील 312 क्रमांकाच्या खोलीत असल्याची माहिती मिळाली.


पोलीस पथकाने सुरक्षेचे सर्व उपाय करीत सदरील हॉटेलला चारही बाजूने वेढा घालून खलीस्तानी दहशतवादी रजेंदरकुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी याला ताब्यात घेत त्याला शिर्डी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या चौकशीत तो पहिल्यांदाच महाराष्ट्रात आला असून त्याच्यावर अमृतसरच्या रणजीत एव्हेन्यू पोलीस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्याबाबत पंजाब पोलिसांना माहिती दिल्यानंतर अमृतसरच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त नागरा यांच्या मार्गदर्शनाखाली समशेर सिंग, जलनजीत सिंग व जर्मनजीत सिंग यांना शिर्डीकडे रवाना केले. त्यांनी आज शिर्डीत येवून सदर आरोपीला ताब्यात घेवून पंजाबकडे रवाना झाले आहेत.

Visits: 330 Today: 1 Total: 1879814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *