शासकीय प्रयोगशाळेकडून गुरुवारी मिळाला संगमनेरकरांना दिलासा! शहरातील मान्यता नसलेल्या एका रुग्णालयात कोविड संशयित महिलेचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोविडचा प्रादुर्भाव दररोज उग्ररुप धारण करीत असतांना कालचा बुधवार मात्र वाढत्या रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लावणारा ठरला. अर्थात गुरुवारी शासकीय प्रयोगशाळेचा एकही अहवाल प्राप्त न झाल्याने रुग्णसंख्या खालावली होती. काल (ता.24) तालुक्यातील एकूण 26 जणांना कोविडची लागण झाल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले. त्यात शहरातील अकराजणांचा समावेश होता. जिल्ह्यातील अहमदनगर व श्रीरामपूर येथील तिघांवरही संगमनेरात उपचार सुरु असून या तिघांचा समावेश गुरुवारच्या तालुक्यातील एकूण बाधितांमध्ये केला गेला आहे, त्यामुळे गुरुवारच्या अहवालात तालुक्यात एकूण 29 रुग्ण आढळल्याचे दर्शविण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अधिक प्रादुर्भाव होणार्‍या भागाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले जात आहे. त्यानुसार विद्यानगर, गणेशनगर व सुतारगल्लीतील काही भाग ‘मायक्रो कंटेन्मेंट’ क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारच्या रुग्णवाढीने तालुका आता 7 हजार 904 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

गेल्या 1 मार्चपासून जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येवू लागले आहेत. गेल्या 25 दिवसांपासून दररोज पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आढळणार्‍या या तालुक्यांमध्ये मात्र अद्यापपर्यंत कोणतेही विशेष निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. मात्र राज्यातील अन्य काही जिल्ह्यात जाहीर झालेला ‘लॉकडाऊन’ आणि तेथील कोविडची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील या तीन तालुक्यांमधील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. तूर्त संगमनेर शहरातील विद्यानगर, सुतारगल्ली व गणेशनगर या परिसरातील काही मर्यादित भागात मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता.24) खासगी प्रयोगशाळेचे 28 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा एक अशा एकूण 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील 68 वर्षीय इसम व वॉर्ड क्र.3 मधील 37 वर्षीय तरुणासह अहमदनगरच्या सारसनगर परिसरातील 16 वर्षीय तरुणावर संगमनेरात उपचार सुरु असल्याने त्यांच्या स्राव चाचणीचा अहवाल संगमनेर तालुक्यात दर्शविण्यात आला आहे. उर्वरीत 26 अहवालांमध्ये 11 रुग्ण शहरातील तर उर्वरीत 15 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत.

शहरातील मेनरोड परिसरातील 54 वर्षीय महिला, अभिनवनगरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रंगारगल्लीतील 26 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 71 वर्षीय ज्येष्ठासह 41 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 57 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला, विद्यानगर मधील 69 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य चौकातील 45 वर्षीय इसम व बालाजीनगर मधील 18 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ग्रामीण क्षेत्रातील घुलेवाडीच्या एकता चौकातील 45 वर्षीय इसम, साईश्रद्धा चौकातील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व घुलेवाडीतील 30 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, खांजापूर येथील 56 वर्षीय इसम, कनोली येथील 55 वर्षीय महिला. कोकणगाव येथील 52 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 35 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 43 वर्षीय तरुण, खराडी येथील 32 वर्षीय तरुण, साकूर येथील 52 वर्षीय इसम, चिखली येथील 35 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 36 वर्षीय महिला व कासारा दुमाला येथील 44 वर्षीय इसम अशा तालुक्यातील एकूण 26 जणांचे अहवाल संक्रमित असून रुग्णसंख्या 7 हजार 904 झाली आहे.

गुरुवारी शहरातील चव्हाणपूरा भागातील एका महिलेचे निधन झाले. सदर महिलेला कोविडचे संक्रमण झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्यावर शहरातील एका मान्यता रद्द झालेल्या रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यामुळे त्यांची स्राव चाचणीच करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ती महिला कोविड संक्रमणाने मृत्यू पावल्याची चर्चा परिसरात असून शासकीय दप्तरी मात्र या मृत्यूची नोंद ‘कोविड’मध्ये करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *