‘आदर्श सरपंच पुरस्कारा’ने वैशाली डोके सन्मानित
नायक वृत्तसेवा, घारगाव
श्रीरामपूर तालुक्यातील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेकडून दरवर्षी सेवाभावी, गुणवंत, संस्था, व्यक्ती आणि उपक्रमांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा ‘आदर्श सरपंच पुरस्कारा’ने संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील माजी सरपंच वैशाली किशोर डोके यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
माजी सरपंच वैशाली डोके यांनी जलयुक्त शिवार, पानी फाऊंडेशन, रस्ते, आरोग्य, वीज, शिक्षण, सांस्कृतिक आदी विषयांत उल्लेखनीय कार्य केले आहे. याच कार्याची दखल घेऊन ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेने त्यांना राज्य स्तरावरील ‘आदर्श सरपंच पुरस्कारा’ने नुकतेच गौरविले आहे. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी देखील त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.