राहुरी तालुक्यातील शेतकर्यांची कांदा बियाण्यात फसवणूक! क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून नुकसान भरपाईची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कांदा बियाण्यात शेतकर्यांची फसवणूक झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन क्रांतीसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आल्याची माहिती राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे यांनी दिली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा येथील शेतकर्यांनी कांदा लागवड केली होती. कांदा लागवडीकरिता भूमीपुत्र सीड्स या कंपनीचे लाईट लाल कांदा बियाणे खरेदी केले होते. या कंपनीच्या लागवड केलेल्या कांद्याची शेतात पाहणी केली असता कांदा हा लाल नसून शुभ्र पांढरा रंगाचा असल्याचे निदर्शनास आले. याबाबत परिसरातील शेतकर्यांनी खातरजमा केली असता हा कांदा लाल नसून शुभ्र पांढरा असल्याची खात्री पटली. तद्नंतर शेतकर्यांनी कांदा बी खरेदी केलेल्या केंद्राशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यांनी या शेतकर्यांना कंपनीच्या अधिकार्यांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.

शेतकर्यांनी दिलेल्या क्रमांकावर बर्याच वेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन उचलण्यास कंपनीच्या अधिकार्यांनी असमर्थता दर्शविली. यामुळे संपर्क होऊ शकला नसल्याकारणाने शेतकर्यांनी क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधत फसवणूक झाल्याची माहिती पुराव्यानिशी दिली. भूमीपुत्र सीड्स या कंपनीकडून कांदा बियाणे विक्रमध्ये शेतकर्यांची फसवणूक झाली आहे. या कारणास्तव शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी कंपनीवर फसवणूक केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करत या कंपनीचा परवाना रद्द करावा व सदर शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
