पालिकेची सभा हाणून पाडण्याचा कोल्हे गटाकडून केविलवाणा प्रयत्न ः वहाडणे

पालिकेची सभा हाणून पाडण्याचा कोल्हे गटाकडून केविलवाणा प्रयत्न ः वहाडणे
‘विरोधासाठी विरोध करू नका’, प्रसिद्धीपत्रकातून विरोधकांना ठणकावले
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शासकीय आदेशानुसार सभागृहात सभा घ्यायला बंदी असल्याने कोपरगाव पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागली. मात्र, 15 सप्टेंबरची सभा हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी केला असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.


राष्ट्रवादी-शिवसेना-अपक्ष नगरसेवक व सर्व अधिकार्‍यांना ऑनलाईन सभेचे कामकाज, बोलणे व्यवस्थित समजत होते; म्हणूनच आम्ही 5 तास चर्चा करून शहर विकासाचे महत्वाचे अनेक विषय सर्वसंमतीने एकमताने मंजूर केले. पण केवळ नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बोलविलेली सभा हाणून पाडायची व कोल्हेंची शाबासकी मिळवून 5 नंबर साठवण तलावाच्या कामात अडथळे आणायचे हेच कुटील डावपेच कोल्हे गटाने आखले होते ते आम्ही यशस्वी होऊ दिले नाहीत. आरक्षण उठविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय सभेला अवगत करण्यात आले. या विषयात आर्थिक स्वार्थ साधल्याचा चुकीचा आरोप करणार्‍यांना मी विचारतो की, बबलू वाणी यांचे दहा एकराचे आरक्षण उठविण्याला बहुमताने मंजुरी तुम्ही का दिली? वाणी यांनाच विचारा की नगराध्यक्ष वहाडणे यांना किती पैसे दिले? क्रीडांगणाची काळजी होती मग वाणी यांचे आरक्षण उठविण्याला तुम्ही संमती का दिली? मला तर वाटते तुम्हीच वाणी यांना लुबाडले असावे.


65 गुंठे जागेत शहराचे क्रीडांगण होऊच शकत नाही, त्यासाठी किमान पाच एकर तरी जागा लागणार आहे. शहरात अजूनही कित्येक जागा आरक्षण क्रीडांगणासाठी आहे. त्यापैकी प्रशस्त जागा क्रीडांगणासाठी पालिका घेणार आहे. शहरातील इनडोअर हॉल मैदानावर काही अतिक्रमणे झालेली आहेत, त्यांना नोटिसाही दिल्या आहेत. क्रीडांगण व खेळाडूंबद्दल कळवळा दाखविणार्‍यांनी हिंमत असेल तर बहुमताचा वापरही अतिक्रमणे काढण्यासाठी करून दाखवावा, राजकिय नेत्यांच्या जागांवरील आरक्षण काढण्यासाठी पुढे असणारे सुनीता क्षीरसागर, श्री.गिरमे या सामान्य नागरिकांनाच का आडवे येतात? दहा-पंधरा वर्षांपूर्वी घेतलेल्या जुन्या घंटागाड्या विकून नवीन घंटागाड्या घेण्याचा विषय समजून न घेता दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या घंटागाड्या विकायला काढल्या अशी बोंब मारणे हा तर मूर्खपणाच आहे. उपलब्ध आर्थिक कुवतीनुसार खुले नाट्यगृह नूतनीकरण करण्याचा आमचा मानस असताना, त्यालाही विरोध करायचे कारणच काय? शहरातील सर्वच क्षेत्रातील कलाप्रेमींचा कलाकारांचा आपण विचारच करायचा नाही का? साईबाबा चौफुली ते येवला नाका रस्त्यावर अंधार असल्याने अपघात होतात पथदिवे लावा असे तुमच्याच युवानेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते हे त्यांचेच चेले का विसरले?


14 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत सर्व प्रभागात विकासकामांचा विषय मंजूर करण्यासाठीही त्यांनी सहकार्य करायचे टाळले. शहरातील प्रमुख रस्तेही आता आपण करणार आहोत. उमाजी गायकवाड यांची काही जागा ग्रीन बेल्टमधून वगळण्याचा विषय सर्व कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता असूनही फेटाळण्याचा प्रयत्न राजपुत्राच्या आदेशानेच त्यांनी केला. नगराध्यक्ष वहाडणे यांच्या दहशतीमुळेच पालिकेच्या दोन कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या असा भंपक आरोपही करण्यात आला. आत्महत्या करणारा रात्रंदिवस कोणत्या वर्तुळात वावरायचा, त्याच्या घरी जाऊन संजीवनीच्या कोणत्या चेल्याने व्याजाचे पैसे वसुलीसाठी दमबाजी केली हे सर्व शहराला माहीत आहे असा खुलासाही त्यांनी केला.


स्वच्छता सर्वेक्षणात कोपरगाव पालिका 16 व्या क्रमांकावर आली आहे. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे होऊ शकले. तरीही आम्ही आमच्याच कौतुकाचे फलक लावून प्रसिद्धी मिळविली नाही. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून, घरोघर सर्वेक्षण करून, शासकिय योजनांची माहिती देऊन शहरवासियांच्या आरोग्यासाठी झटणार्‍या आशासेविकांना शासन फक्त मासिक एक हजार रुपये मानधन देते; त्या आशासेविकांना कोरोना काळात मासिक दोन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णयही महाराष्ट्रात सर्वप्रथम कोपरगाव पालिकेनेच नुकत्याच झालेल्या सभेत घेतला याचाही मला सार्थ अभिमान आहे. भाजपाचे दिवंगत आदर्श नेते पं.दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव शिंदे-शिंगी नगर भागातील पाण्याच्या टाकीला देण्याचा निर्णयही सर्वानुमते घेतला. शहरातील काही जागांवर खोका शॉप करण्याला प्राधान्य देण्याचेही यावेळी ठरले. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराकडून पाच-सहा वर्षांत कोणत्या नेत्यांनी व आजी-माजी नगरसेवकांनी लाखो रुपये उकळले हेही लवकरच समोर येणार आहे हेही संबंधितांनी लक्षात ठेवावे. आर्थिक घोळ उघड झाला म्हणून एखाद्या नगरसेवकाने आत्महत्या केली तरीही मलाच जबाबदार धराल हेही मी जाणून आहे. नगराध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत कुठलेही राजकारण न करता मी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. कोल्हे गटाच्या पातळीवर जाऊन मीही गटबाजीचे गलिच्छ राजकारण केले तर शहर विकास होणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पाच नंबरचा साठवण तलाव, खोका शॉप, रस्त्यांचे नूतनीकरण, खुले नाट्यगृह, कचेश्वर-शुकलेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र पर्यटन प्रस्ताव मंजुरी, शहराचे आरोग्य, भूखंड विकास इत्यादी विषयांना चालना द्यायचे सर्वानुमते ठरले आहे. कारभारात नाहक अडथळे आणणार्‍या प्रवृत्तींना जाहीरपणे इशारा देतो की, विरोधासाठी विरोध करू नका असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठणकावून सांगितले.

Visits: 50 Today: 1 Total: 435790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *