येठेवाडी प्रकरणी ‘त्या’ आठजणांवर होणार खुनाचा गुन्हा दाखल! मृतदेहाची ओळख पटली; न्यायालयाकडून सर्व आरोपींना पोलीस कोठडी, दोघे मात्र पसार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आईशी असलेल्या प्रेमसंबंधाचा मनात राग धरुन बाप-लेकाने तिच्या प्रियकराचे अपहरण केल्यानंतर त्याला वेल्हाळे शिवारात नेले. तेथे त्याला दिवसभर डांबून अमानुषपणे मारहाण केल्यानंतर रात्री त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केला व त्याचा मृतदेह आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने गेल्या बुधवारी (ता.10) कासारवाडी शिवारातील पुलावरुन प्रवरानदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. या प्रकरणी शहर पोलिसांनी सुरुवातीला सहा जणांना ताब्यात घेवून मृतदेहाचा शोध घेतला. मात्र पुराच्या पाण्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर ताब्यात असलेल्या सहा जणांवर अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या घटनेच्या तब्बल आठव्या दिवशी दाढ शिवारात मयताचा मृतदेह आढळला असून त्याची ओळख पटविण्यातही पोलिसांना यश आल्याने अटकेत असलेल्या सहा जणांसह पसार असलेल्या अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर अटकेत असलेल्या सहाजणांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.22) पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्याच्या पठारभागातील येठेवाडी येथील एका विवाहित महिलेचे गावातील बाळू शिरोळे या इसमाशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच सुमारे 18 वर्षांपूर्वी सदरची महिला त्याच्यासोबत पळून गेली होती, तेव्हापासून ती त्याच्यासोबतच रहात होती. ही घटना घडली तेव्हा अवघ्या 9 वर्षांच्या असलेल्या तिच्या मुलाला ही गोष्ट सहन झाली नाही. परंतु त्यावेळी त्याचे वय कमी असल्याने तो काही करु शकला नव्हता, मात्र या संपूर्ण प्रकरणाची सल त्याच्या मनात कायम होती. त्यामुळे तो तेव्हापासून प्रतिशोध घेण्याचा अग्नी मनात बाळगून योग्य संधीची वाट बघत होता. त्यासाठी त्याने आपल्या वडिलांसह नियोजनबद्ध कटही आखून ठेवला होता.
त्यानुसार गेल्या बुधवारी (ता.10) बाळू शिरोळे हा न्यायालयीन कामकाजासाठी संगमनेरात येणार असल्याची माहिती आरोपी सागर शिवाजी वाडगे याला मिळाल्यानंतर त्याने आपले वडिल व अन्य सहा साथीदारांसह त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास घुलेवाडीतून त्याचे बळजोरीने अपहरण करुन त्याला वेल्हाळे शिवारात आडरानातील एका खोलीत नेले व तेथे त्याला या सर्वांनी हाताने व कंबरेच्या पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केली. दिवसभर सुरु असलेल्या या मारहाणीत रात्र होताहोता बाळू शिरोळे बेशुद्ध झाला. त्यानंतर सागर व त्याचे वडिल शिवाजी वाडगे या दोघांनी दगडाने डोके ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला व त्याचा मृतदेह अन्य दोघांनी मोटर सायकलवर आणून कासारवाडी शिवारातील पुणे-नाशिक महामार्गाच्या पुलावरुन दुथडी वाहत असलेल्या प्रवरानदीच्या पात्रात फेकून दिला.
गुरुवारी (ता.11) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांना याबाबतची कुणकूण समजली. त्याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या पथकाला सूचना करीत तपासकामी रवाना केले. सायंकाळ होताहोता त्यांच्या पथकाने या प्रकरणाची प्राथमिक माहिती काढण्यासह मुख्य सूत्रधारासह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीवरुन दुसर्या दिवशी (ता.12) आणखी दोघांना ताब्यात घेतले गेले तर दोघेजण पसार झाले. या दरम्यान पोलिसांनी गुरुवारपासून नदीपात्रात फेकून देण्यात आलेल्या बाळू शिरोळे याचा कसून शोध घेतला. मात्र दरम्यानच्या कालावधीत पाणलोटातील पावसाचे प्रमाण वाढल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. त्याचा परिणाम अथक प्रयत्नांनंतरही पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागला नाही.
त्यामुळे एकीकडे सहा जणांना ताब्यात घेवून एकामागून एक दिवस उलटत असतांना कथीत खून झालेल्या इसमाचा मृतदेह सापडत नसल्याने पोलीस कायदेशीर अडचणीत सापडले होते. मात्र त्यावर उपाय शोधतांना गेल्या शुक्रवारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वतः फिर्यादी होवून ताब्यात असलेल्या सहा जणांसह आठ जणांनी मिळून बाळू शिरोळे याचे बरेवाईट करण्यासाठी घुलेवाडीतून त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतल्यापासूनच्या तब्बल तिसर्या दिवशी त्या सहा जणांना कारागृहात टाकले. या दरम्यान बाळू शिरोळे यांचा कासारवाडी ते ओझर बंधारा या परिसरापर्यंत शोध सुरुच होता, मात्र त्यात पोलिसांना यश मिळत नव्हते.
गेल्या सोमवारी (ता.15) नाशिकहून ओझर खुर्द येथे आलेला एक मालवाहतूक टेम्पो रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील प्रवरानदीच्या पुलावरुन नदीपात्रात कोसळला व बुडाला. या वाहनात चालकासह तिघेजण होते, मात्र एकजण त्यातून कसाबसा बाहेर पडून पोहोत किनार्यावर आल्याने बचावला. मंगळवारी सदरची घटना समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनासह तालुका पोलिसांनी पिंपरणे शिवारापासून पुढे शोध मोहीम सुरु केली असता काल बुधवारी (ता.17) शोधपथकाला दाढ शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. सदरचा मृतदेह वेल्हाळे खून प्रकरणातील बाळू शिरोळे याचाच असण्याची शक्यता वर्तविली गेल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना पाचारण करीत तो लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
बुधवारी सायंकाळी लोणीत पोहोचलेल्या बाळू शिरोळे याच्या कुटुंबातील सदस्यांनी सदरचा मृतदेह ओळखला. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची शोध मोहीम थांबविण्यात आली, मात्र त्याची ओळख पटल्यानंतरही पोलिसांनी सदर मृतदेहासह त्याची ओळख पटविण्यासाठी आलेल्या त्याच्या कुटुबियांच्या रक्ताचे नमूने घेत त्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी गेल्या आठ दिवसांपासून अटकेत असलेल्या सागर शिवाजी वाडगे (वय 27), अण्णासाहेब सूर्यभान वाडगे (वय 41, दोघेही रा.येठेवाडी), संपत मारुती डोळझाके (वय 45, रा.साकूर), मनोज एकनाथ चव्हाण (वय 27, रा.पेमगिरी), शुभम सुनील खताळ (वय 21, रा.धांदरफळ खुर्द) व दाऊ उर्फ दिनेश बाळू जेधे (वय 32, रा.कामगार वसाहत, घुलेवाडी) या सहा जणांसह अद्याप पसार असलेल्या शिवाजी गेणू वाडगे व दत्तु वाडगे अशा एकूण आठ जणांवर खुनाचे वाढीव कलम लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अटकेत असलेल्या सहा जणांना संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्या सर्वांना सोमवारपर्यंत (ता.22) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात कायदेशीर अडचणी निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी यापूर्वीच या आठही जणांवर बरेवाईट करण्याच्या उद्देशाने कट रचून अपहरण करणे, मारहाण करणे व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह पुरावा नष्ट केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात आता भारतीय दंडसंहितेचे कलम 302 ही वाढविले जाणार आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा पोलिसांनी स्वतः दखल घेवून कसून शोध घेतल्याने व त्यातील मुख्य सूत्रधारासह बहुतेक आरोपींना अटक केल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना संगमनेरात ‘मिस्टर बाँड’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या येथील कार्यकाळात कोणतेही ठोस पुरावे हाती नसतांना तब्बल अर्धाडझनहून अधिक खुनाचे प्रकार उघड करण्यासह सोनसाखळी लांबविण्याच्या घटना, शहरातील विविध भागातून मोटार सायकल व मोबाईल चोरीच्या घटनांचा छडा लावला आहे. या प्रकरणातही पोलिसांकडे केवळ ऐकिव माहितीशिवाय ठोस काहीही नसतांनाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पो.ना.अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, सायबर सेलचे पो.ना.फुरकान शेख (श्रीरामपूर) यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावतांना अवघ्या आठ तासांतच सहा जणांना अटक केली होती.