महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा युवक क्रांती संघटनेकडून निषेध तहसीलदारांना दिले निवेदन; बँकांच्या खासगीकरणासही केला जोरदार विरोध

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला असून, आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. इंधन दरवाढ आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण यांचा तीव्र शब्दांत निषेध करुन अकोले तालुका युवक क्रांती संघटनेने नुकतेच तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे परिणामी शेतकरी, शेतमजूर व सामान्य माणूस महागाईने होरपळत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर त्याचे गंभीरपणे परिणाम दिसत आहे. केंद्र सरकारने केलेली नोटबंदी, जी.एस.टी. कायदा ही सर्व धोरणे शेतकरी व सामान्यांच्या मूळावर आली आहे. बी-बियाणे, औषधे, खते, ट्रॅक्टर यांसह शेतीसाठी लागणार्या इंधनात सातत्याने होणार्या दरवाढमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. यांसह शेतीशी संलग्न अनेक बाबींवर त्याचा विपरीत परिणाम दिसत आहे.

दुसर्या बाजूने उत्पादित माल कवडीमोल भावाने बाजारात विकावा लागत आहे. यामुळे शेती क्षेत्र व शेतकरी डबघाईच्या खाईत लोटला असून तो उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच केंद्र सरकारचे वर्तमान तीन कृषी कायदे उद्योगपतीधार्जिणे व शेतकर्यांना गुलाम बनवणारे आहेत. त्याचबरोबर सामान्य माणसाशी संबंधित असणारे मोबाईल रिचार्जचे दर, मनोरंजनाशी संबंधित टीव्ही चॅनेलचे दर कमालीचे वाढले असून यांसारख्या कित्तेक वस्तूंचे दर सामान्य माणसांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. त्यातच केंद्र सरकार सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा डाव देशातील भांडवलदारांच्या हिताने घेत असून ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य माणूस बँकिंग व्यवस्थेतून हद्दपार होण्याची शक्यता आहे. अशी अनेक सरकारची धोरणे शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणूस यांच्या विरोधी आहे. या जनविरोधी धोरणांचा अकोले तालुका युवक क्रांती संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक विनोद हांडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेळके, कार्याध्यक्ष गणेश कोकणे, तालुका सचिव रामनाथ शिंदे, प्रवक्ते अशोक राक्षे, माजी अध्यक्ष विकास बंगाळ, सरचिटणीस दत्ता धुमाळ, तालुका उपाध्यक्ष संदीप तोरमल, प्रवरा विभागाचे अध्यक्ष डॉ.सचिन गुंजाळ, विकास हासे, तालुका उपाध्यक्ष गोरख कदम, विकास आंबरे, तालुका उपाध्यक्ष अजित आवारी, डॉ.रामहरी चौधरी, रोहित हासे, कृष्णा हासे, महेश पोखरकर, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब चौधरी, बापू चौधरी, आत्माराम चौधरी, विठ्ठल वाळुंज, प्रवीण यादव, मुळा विभाग अध्यक्ष योगेश यादव, अशोक वाकचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
