चिंताजनक : अकरा दिवसांतच आढळले जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक रुग्ण! एकूण बाधितांमध्ये अहमदनगर, संगमनेर व राहाता तालुक्यातील 63 टक्के रुग्णांचा समावेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही असंवेदनशील नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा सुरू झालेल्या कोविड संक्रमणाने अहमदनगर जिल्ह्याची कोविड स्थिती पुन्हा चिंताजनक पातळीवर पोहोचवली आहे. गेल्या 1 मार्चपासूून भराला आलेल्या कोविडच्या प्रादुर्भावात अवघ्या अकरा दिवसांतच सरासरी 279 रुग्ण दररोज या वेगाने जिल्ह्यात तब्बल 3 हजार 66 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर, राहाता आणि संगमनेर या तीन तालुक्यातच त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या साखळीत आजही जिल्ह्यात 316 रुग्ण आढळले असून त्यात अहमदनगर तालुक्यातील 115, राहाता तालुक्यातील 60 तर संगमनेर तालुक्यातील 45 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोविडच्या आलेखात जिल्हा आता 79 हजार 19 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत जिल्ह्यातील वाढलेली रुग्णगतीची सरासरी तिपटीहून अधिक असल्याने चिंता वाढल्या आहेत.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगर महापालिका क्षेत्रासह संगमनेर व राहाता तालुक्यात कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या तडाख्याने परिस्थिती चिंताजनक बनवली आहे. जानेवारीत जवळपास माघार घेतलेल्या कोविडने फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत जिल्ह्याची रुग्णसंख्या शंभरीत आणली होती. त्यातच देशासह जिल्ह्यातही सर्वदूर लसीकरणाला वेग आल्याने कोविडचा पराभव टप्प्यात दिसत असतांना काही असंवेदनशील नागरिकांच्या हव्यासापायी जिल्ह्याच्या मुख्यालयासह संगमनेर व राहाता या तालुक्यात मोठ्या प्रमाणात तर कोपरगाव व शेवगाव तालुक्यात वेगात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा सुरु झाला.

गेल्या 1 मार्चपासून विचार करता जिल्ह्यात अवघ्या 11 दिवसांतच तब्बल 3 हजार 66 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णवाढीची ही सरासरी फेब्रुवारीपेक्षा तीन पटीने अधिक म्हणजे 279 रुग्ण दररोज आहे. त्यातही कोविडचे संक्रमण जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येच अधिक वेगाने फोफावत असल्याचेही प्राप्त आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या अकरा दिवसांत अहमदनगरमध्ये (महापालिका क्षेत्र व तालुका) सरासरी 105 रुग्ण दररोज या वेगाने 1 हजार 159 रुग्ण, संगमनेर तालुक्यात दररोज 38 रुग्ण या वेगाने 418 रुग्ण, राहाता तालुक्यात दररोज 31 रुग्ण या गतीने 344 रुग्ण, कोपरगाव तालुक्यात दररोज 13 रुग्ण या गतीने 143 रुग्ण तर शेवगाव तालुक्यात दररोज 12 रुग्ण या गतीने 128 रुग्णांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या पाच तालुक्यातच एकूण रुग्णसंख्येतील 2 हजार 192 (71.49 टक्के) रुग्ण आढळले आहेत.

हमदनगर शहरानंतर वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत संगमनेर शहर संपन्न समजले जाते. त्यामुळे वाढत्या रुग्णगतीत संगमनेर व अकोले तालुक्यातील रुग्णांसाठी संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था होवू शकते. मात्र जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यातील वैद्यकीय सुविधांची अवस्था लक्षात घेता जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणांवरील रुग्णालये तुडूंब झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना मात्र उपचारांसाठी पराकाष्ठा करण्याची वेळ येवू शकते अशी आजची स्थिती आहे. त्यातच संगमनेरात उपचारांची सुविधा असली तरीही गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल करुन घेण्यास काही रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जाते, त्यामुळे अशा रुग्णांना नाईलाजास्तव अहमदनगर अथवा नाशिकला हलवावे लागते.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये गेल्या अकरा दिवसांत कोविडने डोके वर काढल्याचे दिसत आहे. त्यात (कंसात 1 मार्चपासूनचे एकूण रुग्ण) श्रीरामपूर (107 रुग्ण), पारनेर (107 रुग्ण), अकोले (105 रुग्ण), नेवासा (99 रुग्ण), पाथर्डी (95 रुग्ण), राहुरी (94 रुग्ण), कर्जत (78 रुग्ण), श्रीगोंदा (65 रुग्ण), लष्करी क्षेत्र (47 रुग्ण), जामखेड (36) व लष्करी रुग्णालयात (1 रुग्ण) असे एकूूण 3 हजार 66 रुग्ण आढळून आले आहेत. आजवर जिल्ह्यातील 76 हजार 16 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. 1 हजार 168 रुग्णांचे कोविडने बळी घेतले आहेत तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1 हजार 835 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 96.20 टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *