उंबरी शिवारातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी महसूलची 23 लाखांची नोटीस

उंबरी शिवारातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी महसूलची 23 लाखांची नोटीस
ग्रामस्थांच्या तक्रारीची तहसीलदारांनी घेतली दखल; तर मुरूम व वाळूतस्करांमध्ये उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील उंबरी शिवारातील टेकडी फोडून अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार अमोल निकम यांनी शरद बाळासाहेब ब्राह्मणे (रा.उंबरी बाळापूर) यांना तब्बल 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील मुरूम व वाळूतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, उंबरी येथील गट क्रमांक 335/1/1 मधील टेकडीवर उत्खनन करुन शरद ब्राह्मणे यांनी रोज सुमारे 30 ते 40 ट्रॅक्टर ट्रॉली मुरुमाची विक्री केली. यामुळे गावातील आणि शिवार रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत सरपंच, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे नेते सरुनाथ उंबरकर यांनी सह्यांनिशी ब्राह्मणे यांनी सुमारे 15 ते 20 हजार ब्रास मुरुमाची विक्री केल्याची तक्रार तहसीलदारांकडे निवेदनातून केली होती. यामध्ये म्हंटले होते की, महसूल विभागातील कर्मचारी-अधिकारी वाहतूक होताना वाहन पकडत. परंतु काहीवेळाने सोडून देत. यामुळे कारवाईबाबत शंका उत्पन्न होत असून सात दिवसांच्या आत पंचनामा करुन दंडात्मक कारवाई करावी. जर याप्रकरणी कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. अखेर तहसीलदार निकम यांनी तातडीने दखल घेत उंबरी येथे 110 फूट लांब, 20 फूट रुंद व 10 फूट खोलीचे खोदकाम झाल्याचा अहवाल सादर केला.

उंबरी बाळापूरचे कामगार तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यातून तब्बल 220 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन व विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार तहसीलदारांनी शरद ब्राह्मणे यांना 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच सात दिवसांच्या आत उत्तर देण्यासही सांगितले आहे. या नोटिसीमुळे संगमनेर तालुक्यात राजरोसपणे सुरू असणार्‍या गोरखधंद्यात खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा, मुळा, आढळा व म्हाळुंगी नद्यांतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना महसूलकडून मात्र दिखाव्यापुरती कारवाई होते. याबाबत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सूज्ञ नागरिकांनी माध्यमांद्वारे आवाज उठवूनही काही उपयोग होत नसल्याचे अनेकदा उघडकीस आलेले आहे. परंतु, उंबरी बाळापूर ग्रामस्थांच्या एकजुटीने महसूल विभागाला कारवाई करण्यास भाग पाडल्याने आता महसूल विभाग नोटिसीनंतर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 116725

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *