भाविकांविना महाशिवरात्री पर्व पडले पार; सर्वत्र शुकशुकाट.. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनास भाविकांचा प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.11) असणार्‍या महाशिवरात्री पर्वानिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने शहरातील भवानी बागेजवळील भवानी शंकर मठ, जवळे बाळेश्वर (बाळेश्वर), खांडगाव (खांडेश्वर), कोकणगाव (निझर्णेश्वर), धांदरफळ (रामेश्वर), खंदरमाळ (खंद्रेश्वर), आंबीदुमाला (संगमेश्वर) या देवस्थानांना दिल्या होत्या. त्यामुळे देवस्थान व्यवस्थापनाने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद देत बहुधा पहिल्यांदाच भाविकांविना महाविशवरात्री पर्व पार पडले आहे. यामुळे वरील सर्व ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.

कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच दिवसेंदिवस शहरासह खेड्यांतही बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘पुन्हा’ एकदा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना निर्गमित केल्या आहेत. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानुसार गुरुवारी असलेल्या महाशिवरात्री पर्वानिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाने तालुक्यातील महादेवाचे स्थान असणार्‍या देवस्थानांना दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन देवस्थानांनी केले होते. त्यास भाविकांनी प्रतिसाद देत दर्शनासाठी कोठेही गर्दी केल्याचे दिसून आले नाही. तर सर्वच देवालयांत भाविकांविना महाशिवरात्री पर्वानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले.

विशेष म्हणजे महाशिवरात्री पर्वानिमित्त प्राचिन आख्यायिका असलेल्या शहरातील भवानी बागेजवळील भवानी शंकर मठ येथे दरवर्षी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना यंदा प्रशासनाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली होती. यासह तालुक्यातील जवळे बाळेश्वर (बाळेश्वर), खांडगाव (खांडेश्वर), कोकणगाव (निझर्णेश्वर), धांदरफळ (रामेश्वर), खंदरमाळ (खंद्रेश्वर), आंबीदुमाला (संगमेश्वर) येथील धार्मिक कार्यक्रमही भक्तांविना पार पडले. यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात भरणार्‍या यात्रौत्सवात खाऊ, खेळणी, रहाटपाळणे यांचा मनमुराद आनंद भाविकांना घेता आला नाही.

एरव्ही यात्रौत्सव म्हटला की भाविकांची दर्शनासाह यात्रौत्सवात आनंद घेण्याची लगबग असते. परंतु, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वच यात्रौरद्द रद्द करण्याच्या सूचना संबंधित देवालयांना दिल्या होत्या. त्यानुसार देवस्थान व्यवस्थापनाने गर्दी न करण्याच्या भाविकांना केलेल्या आवाहनाला सर्वत्र प्रतिसाद दिसून आला.

Visits: 162 Today: 1 Total: 1599077

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *