गुरुवारी संगमनेर तालुक्यात आढळले विक्रमी बाधित रुग्ण! पोलिसांकडून लग्न सोहळ्यांवर ‘छापे’; मात्र संक्रमण वाढीत फरक पडेना
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लग्न सोहळ्यांनी बिघडवलेली तालुक्याची कोविड स्थिती अद्यापही अनियंत्रितच असून गुरुवारी त्यात विक्रमी रुग्णांची भर पडली. तालुक्यातील संक्रमण वाढीला कारणीभूत ठरलेल्या लग्न सोहळ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण होवूनही नागरिक त्यातून बोध घेण्यास तयार नसल्याचे भयानक चित्रही सध्या तालुक्यात दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सात ठिकाणी थेट छापे घालीत त्यातील तीन लग्न सोहळ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र त्यातून संक्रमणात कोणतीही घट झाली नसल्याचे गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालातून समोर आले आहे. आज तालुक्यातून एकूण 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 24 जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 249 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 285 वर पोहोचली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यापासून तालुक्यातील संक्रमणात टप्प्याटप्प्याने वाढ झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याची कोविड स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. गर्दीतून प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने यापूर्वीच लग्न सोहळ्यांवर उपस्थितीचे बंधन घालतांना उर्वरीत सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र असे असतांनाही काही असंवेदनशील नागरिक अद्यापही त्यातून कोणताही बोध घ्यायला तयार नसल्याचे भयानक चित्रही दिसून येत आहे. अशा सोहळ्यांवर कारवाईसाठी प्रशासनाने आता कंबर कसली असून शहर पोलिसांनी सात ठिकाणी छापे घालीत सुरु असलेल्या सोहळ्यांची तपासणी केली.
यावेळी घुलेवाडी येथील पाहुणचार मंगल कार्यालय, राजापूर परिसरातील विठाई मंगल कार्यालय व गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर परिसरात घराच्या समोर मांडव घालून मोठ्या उपस्थितीत लग्नकार्य सुरु असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे वधू पक्षाच्या मंडळींवर प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीनही ठिकाणे मिळून पोलिसांनी 30 हजारांचा दंड वसूल केला व त्याठिकाणी जमलेल्या अतिरीक्त गर्दीला पांगवले. दररोज कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाही काही नागरिक अशा पद्धतीचे सोहळे आयोजित करुन एकप्रकारे अनेक नागरिकांचे जीवन संकटात आणीत आहेत.
गुरुवारी (ता.11) तालुक्यातून विक्रमी 64 रुग्ण समोर आले. त्यात शहरातील 24 तर ग्रामीणभागातील 40 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रुग्णांमध्ये मालदाड रोडवरील 54 वर्षीय इसमासह 65 व 28 वर्षीय महिला, विद्यानगर मधील 42 वर्षीय तरुण, अरगडे गल्लीतील 58 वर्षीय महिला, अभिनवनगर मधील 46 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय दोघे तरुण, सत्संगनगर मधील 47 वर्षीय इसम, देवीगल्लीतील 50 वर्षीय इसमासह 39 वर्षीय महिला, संजय गांधीनगर मधील 19 वर्षीय तरुणी, अकोले नाका परिसरातील 18 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 70 वर्षीय महिला, सुयोग सोसायटीतील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गणेशनगर मधील 58 व 55 वर्षीय इसम, पंजाबी कॉलनीतील 36 वर्षीय तरुण, नाशिक रोडवरील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घासबाजारातील 27 वर्षीय महिला,
मेनरोडवरील 42 वर्षीय तरुण, इंदिरानगरमधील 55 वर्षीय इसम व बाजारपेठेतील 23 वर्षीय तरुण तर ग्रामीण भागातील वाघापूर येथील 13 वर्षीय मुलगा, सायखिंडीतील 49 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 26 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 व 25 वर्षीय तरुण, 64, 62, 55 व 20 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 54 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 65 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 51 वर्षीय इसमासह चार वर्षीय बालिका, गुंजाळवाडीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 49 वर्षीय इसम, 64 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय दोघी तरुणी, वडगाव पान येथील 36 वर्षीय तरुण, निमज येथील 55 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 61 वर्षीय महिला, समनापूर येथील 39 वर्षीय तरुण, 38 वर्षीय महिला आणि 8 व 5 वर्षांच्या बालिका,
तळेगाव दिघे येथील 49 वर्षीय इसमासह 40 व 31 वर्षीय तरुण, घारगाव येथील 40 व 21 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 55 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला, शिबलापूर मधील 29 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 34 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 70 वर्षीय महिला, देवकौठे येथील 35 वर्षीय तरुण व कासारा दुमाला येथील 65 वर्षीय महिला असे एकूण 64 रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 249 झाली असून सक्रीय संक्रमितांची संख्या 285 वर पोहोचली आहे.
संपुष्टात आलेल्या संगमनेर तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाला पुन्हा बोलावण्यात गेल्या महिन्याभरात साजरे झालेले लग्न सोहळे कारणीभूत आहेत. त्यामुळे अशा सोहळ्यांवर आता दंडात्मक कारवाई होत असली तरीही त्यातून कोविडच्या संक्रमणाचा वेग कमी झालेला नाही आणि असे सोहळे आयोजित करणार्यांची संख्याही संपलेली नाही. गेल्या दोन दिवसांत शहर पोलिसांनी तब्बल तीन ठिकाणी केलेल्या कारवाईतून हिच गोष्ट स्पष्ट झाली आहे. यावरुन संगमनेर तालुक्यातील नागरिकांना अद्यापही कोविडचे गांभीर्य लक्षात आले नसल्याचे दिसून येत आहे.