कळसमध्ये काळी गुढी उभारुन केंद्र सरकारचा केला निषेध! अकोले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनोखे आंदोलन..

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यभर गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना कळस (ता.अकोले) येथे मात्र काळी गुढी उभारण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाया आदिंबाबत शुभदिनीच मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सद्यस्थितीत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल शतकाजवळ पोहोचले आहे. स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. खाद्यतेल तर सर्वसामान्यांना परवडेनासे झाले आहे. तरुणाई रोजगारापासून वंचित आहे. तर दुसरीकडे राजकीय सूडबुद्धीतून राज्य सरकारमधील मंत्री व विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्र सरकार सक्तवसुली संचालनालय, सीबीआय, आयकरच्या धाडी टाकत आहे. याच्या निषेधार्थ अकोले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने कळस येथील पदाधिकारी प्रभात चौधरी यांनी काळी गुढी उभारली आहे. या गुढीवर वरील घटकांचे निषेधात्मक फलक चिकटविलेले आहे.

खरेतर साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचबरोबर मराठी नववर्षाचा प्रारंभही या दिवसापासून होतो. याचे औचित्य साधूनच केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी प्रभात चौधरी यांनी सांगून मोदी सरकार हे जुगलबाजीचे व आकडेवारीचे सरकार आहे. 2022 पर्यंत आम्ही जगामध्ये अव्वल असू, परंतु महागाई ते अव्वल असल्याची टीका चौधरी यांनी केली. या अनोख्या निषेधाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 29277

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *