संगमनेर तालुक्याने कायम कार्यकर्त्यांचा सन्मान जपला ः थोरात खळी येथील शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाण्यासाठी संघर्ष करून तालुक्यात समृद्धी निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. पाराजी चकोर यांनी पाणी, शिक्षण व सहकारात आयुष्यभर समर्पित भावनेने काम केले असून विकासातून वैभवाकडे जाणार्‍या संगमनेर तालुक्याने कायम कार्यकर्त्यांचा सन्मान जपला आहे. गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम, नेतृत्वाचा विश्वास आणि जनतेचे प्रेम यामुळे संगमनेरचा राज्यात मोठा सन्मान असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील खळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.माधव कानवडे होते. तर व्यासपीठावर महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे, सभापती शंकर खेमनर, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, गणपत सांगळे, संपत डोंगरे, संतोष हासे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, विष्णूपंत रहाटळ, आर.बी.रहाणे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, भिमाजी राहिंज, नवनाथ महाराज आंधळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. अडचणीत असूनही शेतकर्‍यांना मोठी मदत केली आहे. या सर्व संकट काळानंतर संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. संगमनेरमधील साखर कारखाना, दूध संघ व इतर सहकारी संस्था अत्यंत चांगले काम करत असून यामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. समान संधी देवून कायम सर्वांचा सन्मान केला आहे. गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेरमध्ये केले जात आहे.

सहकारातील कार्यकर्त्यांनी या सहकारी संस्था प्रपंच्यासारख्या सांभाळल्या आहेत. या विभागाने कायम आपल्यावर भरभरून प्रेम केले आहे. तालुक्यात सध्या सात लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून यामुळे ग्रामीण अर्थकारण मजबूत झाले आहे. मागील अडीच वर्षापासून निळवंडेच्या कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू आहे. महसूल विभागामध्ये डिजिटल सातबारा, ई-पीक पाहणी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या सर्व विकासाच्या वाटचालीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून हीच परंपरा आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी आपला तालुका आपली अस्मिता म्हणून एकत्रित काम करावे असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते पाराजी चकोर म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर कायम विश्वास टाकला. कायम वडीलधारी या नात्याने खूप आदर सन्मान केला. किशोर वाघमारे, विनायक थोरात, तुकाराम दातीर, संतोष मांडेकर, बाबासाहेब गायकर, गोरख नवले, इंद्रजीत खेमनर, सुभाष गुंजाळ, सीताराम वर्पे, नितीन सांगळे, पांडुरंग वाघमारे, प्रा. बाबा खरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सूर्यभान सानप, सुनील नागरे, अनिल कांगणे, साहेबराव तांबे, सोन्याबापू लबडे, मच्छिंद्र चकोर, संतोष सानप, छबू नागरे आदिंसह खळी, झरेकाठी, दाढ, चनेगाव, पिंपरी लौकी आजमपूर या गावांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सर्जेराव चकोर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *