पठारभागातील टोमॅटो उत्पादकांच्या भाबड्या आशेवर फिरले पाणी! मोठा खर्च करुन मिळतोय कवडीमोल बाजारभाव; सततच्या संकटाने शेतकरी त्रस्त

नायक वृत्तसेवा, घारगाव
साहेब, विकतचे पाणी आणून आम्ही पोटच्या मुलांसारखं टोमॅटोचे फड जगवले. चांगले बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र अचानक टोमॅटोचे बाजारभाव कोसळल्याने आम्ही खर्च तरी कसा फेडायचा अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी भागातील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी मांडल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोविडचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडविल्याने शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. यामुळे उदरनिर्वाह करायचा तरी कसा सवालही करत आहे.

निसर्गाचा सहवास लाभला असतानाही पठारभागात कायमच दुष्काळ पडतो. जणूकाही त्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे. पाऊस झाला तरच खरीप हंगाम घेऊन संपूर्ण वर्षभराचे नियोजन करायचे. म्हणून नगदी पीक असलेल्या टोमॅटोची दरवर्षी लागवड करुन उत्पन्न घेतात. यामुळे परिसरातील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी ही गावेच ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून ओळखले जातात. पावसाच्या भरवशावर टोमॅटोची लागवड करुन राबराब राबतात. बाजारभाव मिळाल्यास कर्ज फेडणे, घर बांधणे, मुलांचे शिक्षण, लग्न करणे सोपे होईल अशी भाबडी आशा ठेवतात. मात्र, ऐनवेळी बाजारभाव कोसळतात आणि आशेवर पाणी फिरते.

कायमच संकटाशी दोन हात करण्याची सवय झाल्याने वेळप्रसंगी टँकरद्वारे विकतचे पाणी आणून फड जिवंत ठेवतात. यासाठी मोठा खर्चही सोसतात. यंदा हे चित्र पुरते बदलून गेले आहे. मशागत, लागवड, औषध फवारणी व मजुरीचा खर्च करुनही कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो तोडायलाच परवडत नसल्याची स्थिती आहे. जर अजूनही खर्च केला आणि तो सुद्धा फिटला नाही तर करायचे काय? असा प्रश्न सतावत आहे. यामुळे हंगाम वाया जावून पुढील हंगामही करता येतो की नाही या विवंचनेत पठारभागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सापडले आहेत.

टोमॅटोला यंदा चांगले बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आज कवडीमोल भावाने टोमॅटो विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. असेच बाजारभाव राहिले तर झालेला खर्चही वसूल होणार नाही. त्यामुळे शेतकर्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे.
– रामदास ढेरंगे (शेतकरी, खंडेरायवाडी)

दीड एकर टोमॅटोचा फड सुरू होता. मात्र साठ ते सत्तर रुपये एका कॅरेटचे होत आहे. यामुळे झालेला खर्चही वसूल होत नाहीये. त्यामुळे संपूर्ण फड काढून टाकला आहे. आज कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यातच कोरोनाचे संकट सुरू असल्याने शेतकर्यांची न घर का न घाट का अशी दयनीय अवस्था झाली आहे.
– सुरेश गाडेकर (प्रगतिशील शेतकरी, आंबीखालसा)
