संगमनेरच्या पठारभागातील पाझर तलावांनी गाठला तळ! कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दिसू लागल्या पाणी टंचाईच्या झळा..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठार भाग हा डोंगररांगामध्ये वसलेेला असल्याने कायमच दुष्काळाच्या झळया सोसाव्या लागतात. पाण्याचे उद्भव व स्त्रोत नसल्याने शेतीसह पिण्याची पाण्याचे उन्हाळ्यात संकट निर्माण होते. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पठारभागातील अनेक पाझर तलावांनी तळ गाठला असून, काही पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा वणवण करण्याची दुर्दैवी वेळ येणार आहे.

संगमनेरचा पठारभाग हा सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेला आहे. त्यातच निसर्गाची वक्रदृष्टी आणि जलसाठे नसल्याने दुष्काळ हा जणू येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. एकीकडे पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र, उन्हाळ्यात हे चित्र पुरते बदूलन जाते. उन्हाच्या कडाक्याने सगळी डोंगर उजाड पडण्यासह शेतीही पडीक राहते. विशेष म्हणजे पावसाळ्यात तुडूंब भरणारे जलस्त्रोत उन्हाळ्यात मात्र रिते होतात. सद्यस्थितीत कडक उन्हाळा चालू होण्यापूर्वीच पाझर तलाव, विहिरींसह इतर जलसाठे कोरडेठाक पडू लागले आहेत. माहुली येथील पाझर तलावाने तर अक्षरशः आत्ताच तळ गाठला आहे.

उन्हाळ्याच्या झळया काही प्रमाणात बसू लागल्या आहेत. परंतु, अजून कडाका वाढण्यापूर्वीच जलसाठे रिते होवू लागल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांत चिंतेचे वातावरण दिसू लागले आहे. येथील उपलब्ध जलसाठ्यांवर शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते. त्यातच कोरड भागविणारे माहुली व डोळासणे येथील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणी टंचाईच्या झळा अधिक गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Visits: 108 Today: 2 Total: 1099025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *