बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येचे धागेदोरे मिळण्याची शक्यता.. लोणी पोलिसांनी हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीचा बनावट माल केला हस्तगत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या अनुषंगाने होत असलेल्या तपासादरम्यान हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीचा बनावट माल राहाता तालुक्यातील कोल्हार येथील तीनचारी येथून लोणी पोलिसांनी हस्तगत केला आहे. आर. टी. एजन्सीज या नावाने हे दुकान सुरू होते. त्यामुळे व्यापारी हिरण यांच्या हत्येचे धागेदोरे कोल्हारमध्ये पकडलेल्या बनावट मालापर्यंत असण्याची शक्यता निर्माण होत आहे.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून प्यादे पकडले वजीर केव्हा हाती लागणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेवणनाथ गुलाब तायडे (वय 31, रा.कोल्हार बुद्रुक, तीनचारी), दीपक शहाजेन (रा.गोंधवणी रस्ता, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीचे मॅन्युफॅक्चरींग नसलेले; मात्र सदर कंपनीचा बनावट लोगो व ट्रेडमार्क तयार करून तसेच हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीच्या वरील मालाचे बनावटीकरण करून तयार केलेले प्रॉडक्ट्स ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून कॉपीटाईट व ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

बेलापूर येथील हत्या झालेले हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीचे डिलर गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. यावरुन हा बनावट माल कोठून आला, कोण तयार करीत आहे, याचा मुख्य सूत्रधार कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या आरोपींकडून मिळण्याची शक्यता आहे. त्यामागे गौतम हिरण यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही हाती लागू शकतो. लोणी पोलिसांनी बनावट टॅकेट उद्ध्वस्त करून गुन्हेगारांना जणू इशारा दिला आहे.

दरम्यान, याबाबत लोणी पोलिसांनी हिंदुस्थान यूनिलिव्हरचे मात्र अधिकृत उत्पादित नसलेले व बनावट नावाचा वापर करून तयार केलेले क्लिनिक प्लस शॅम्पू पाऊच, हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीचे अधिकृत उत्पादन नसल्याचा संशय असलेले फेअर अँड लव्हली क्रिमचे पाऊच असा साडेतीन हजारांचा माल हस्तगत केला असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करीत आहे.

Visits: 104 Today: 3 Total: 1102718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *