‘पुन्हा’ एकदा अवकाळीचा बळीराजाला झटका!
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ‘पुन्हा’ एकदा बळीराजाला जोरदार झटका दिला आहे. रब्बीतील कांदे, गहू, हरभरा, डाळिंब, द्राक्षे आणि मका पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्यांनी अक्षरशः डोक्यालाच हात लावला आहे.
तत्पूर्वी, आधीच एकामागून एक संकटे झेलून रब्बीसाठी शेतकरी मोठ्या धाडसाने सरसावला होता. महागडी कांदा रोपे विकत घेऊन लागवडी केल्या आहेत. त्यातच सतत बदलत असलेल्या हवामानामुळे कांदे, गहू व हरभर्यावर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावापसून बचावासाठी महागडी औषधे खरेदी करुन फवारली. फळबागाही काढणीला येण्याच्या स्थितीत असताना आता अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाणार आहे. गुरुवारी (ता.7) रात्रभर अवकाळीची संततधार बरसल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पठारभागातील घारगाव, साकूर, बोरबन, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द आदी गावांतील शेतकर्यांच्या कांदा लागवडी देखील लांबणार असल्याने चिंताग्रस्त झाले आहेत.