माजी आमदारांविषयी बोलायची हिंमत आहे का? ः कांबळे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
भाजपाच्या माजी आमदार व राज्यात भाजपाचीच सत्ता असतानाही विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी काहीच न करणार्‍या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविरुद्ध एक तरी शब्द बोलायची हिंमत आहे का? असा खडा सवाल माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी विरोधकांना विचारला आहे.

याविषयी आमच्या प्रतिनिधी बोलताना कांबळे म्हणाले, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे शहराच्या हिताचेच कामासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या तारखेला अहमदनगरला गेले होते. 10 वर्षांपासून विस्थापितांना न्याय मिळालेला नाही. अनेकजण विस्थापितांच्या प्रश्नावर केवळ प्रसिद्धीसाठी बातम्या, फोटो व गांधीगिरीचे उद्योग करत आहेत. खरे तर नगराध्यक्ष विजय वहाडणे हे गेल्याच महिन्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगर रचना विभागाच्या अधिकार्‍यांना भेटून आले. फक्त पालिकेच्या नावावर असलेल्या जागेवरच खोका शॉप करता येतील असे उत्तर शासनाने दिलेले आहे. हे माहीत असूनही काहीजण आपल्यालाच विस्थापितांची फार काळजी आहे असे दाखवित असतात. यावरुन माजी आमदार कोल्हे यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला हार घालण्याची धमक तुमच्यात आहे का? असा खडा सवाल केला. तर तुमच्यातील काहीजण तर कोल्हे यांच्या सतत संपर्कात असतात. विस्थापितांना फक्त नादी लावण्याचे काम वर्षानुवर्षे झाले आहे. पण नगराध्यक्ष वहाडणे यांनी मात्र शासनाकडे जाऊन सर्वांसमोर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. पालिकेने 8 ठिकाणच्या जागा शासनास सूचविल्या. पण शासन त्याठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी देत नाही. केवळ बाजारतळ येथेच खोका शॉप होतील. काँग्रेस समितीजवळ खोका शॉपचा प्रस्ताव आहे. तेथेही काहीजण आडवे येताहेत. तरीही पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृपया कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये. किमान ज्यांना कायदे-नियम माहीत अशांनी तरी भान ठेवावे. बातम्या, फोटो व मेसेजमुळे आपण लोकप्रिय होऊ हा गैरसमज काढून टाकावा. लोकशाहीमध्ये प्रत्येकास आंदोलन करण्याचा, टीका करण्याचा अधिकार आहे. पण काही भोळ्या विस्थापितांना सोबत घेऊन, आशेला लावून वेड्यात काढू नये. फक्त येणारी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलने करू नका. हिंमत असेल तर बड्या नेत्यांविरुद्ध बोलून दाखवा असे खुले आव्हान देवून तांत्रिक पूर्तता होऊन बाजारतळ येथे खोका शॉप होणारच असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Visits: 179 Today: 1 Total: 2168355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *