संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 39 वे शतक..! नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरकरांना मिळाला मोठा दिलासा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णवाढीचा वेग कमी होवूनही तालुक्यातील कोविडच्या संक्रमणात आजही सातत्य कायम आहे. दररोज शहरातील तुरळक बाधितांसह ग्रामीणभागातील नवनवीन गावांमधून कोविडचा संचार सुरु असल्याने प्रादुर्भावाचा वेग कमी होवूनही तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येचा धावफलक मात्र सतत हलता आहे. आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या दोन्हीही अहवालांंचे वैशिष्ट्य म्हणजे आज शहराबरोबरच ग्रामीणभागातील रुग्णसंख्याही कमालीची खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याने बाधितांचे 39 वे शतकही ओलांडले असून रुग्णसंख्या 3 हजार 909 वर पोहोचली आहे.

आज बाधित आढळून आलेल्या शहरातील रुग्णांमध्ये मालदाड रोड परिसरात रुग्ण सापडण्याचा सिलसिला कायम असल्याचे दिसून आले. या भागातील 62 व 37 वर्षीय महिलांना संक्रमण झाले आहे. त्यासोबतच कुंभार आळा येथील 30 वर्षीय तरुण व सदा शंकर नगर मधील 14 वर्षीय मुलगा, कोल्हेवाडी रोड येथील 49 वर्षीय महिला, तसेच केवळ संगमनेर असा उल्लेख करुन स्राव चाचणी केलेल्या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव प्राप्त झाला आहे.

शहरा पाठोपाठ तालुक्यातील संख्येतही आज मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यातील ग्रामीण भागात सोळा संक्रमित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्यातील तब्बल सहा रुग्ण एकट्या सारोळे पठार येथील आहेत. आजच्या अहवालानुसार खळी पिंपरी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी बुद्रुक येथील 36 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 14 वर्षीय बालिका, जोर्वे येथील 70 वर्षीय महिला,

सारोळे पठार येथील 32 व 23 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, तसेच सहा वर्षाच्या एका बालिकेसह दोन वर्ष वय असलेले दोन बालक, तळेगाव दिघे येथील 21 वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 34 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 34 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 27 वर्षीय महिला व राजापुरातील 34 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आज शहरातील सात जणांसह तालुक्यातील सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तेवीस जणांची भर पडून तालुका 39 वे शतक ओलांडून 3 हजार 909 वर पोहोचला आहे.

रोजच्या रुग्णवाढीतही दिलासादायक चित्र..
13 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग प्रती दिवस 39.38 रुग्ण असा होता. या 29 दिवसांच्या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 142 रुग्णांची भर पडली. तर 11 सप्टेंबरपासून आज अखेरपर्यंतच्या 36 दिवसांत सरासरी दररोज 46.42 या वेगाने रुग्णसमोर आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 671 नवीन बाधितांची भर पडली आहे. तालुक्यातील संक्रमणाचा वेग असाच राहीला तर येत्या महिना अखेरीस तालुका साडेचार हजारांच्या पुढे जाईल हे नक्की.

चालू महिन्यात रुग्णगतीतला चढ-उतार अनुभवायला मिळाला असला तरीही अगदी सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 42 टक्क्यांवर होते. आजच्या स्थितीत त्यात अमुलाग्र बदल होवून आज तब्बल 92 टक्के रुग्ण बरे होत असल्याने संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत दिलासादायक वार्ता आहे. त्यासोबतच गेल्या महिन्यात तब्बल 20 जणांचे बळी घेणार्या कोविडने या महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसांत 10 ऑक्टोबररोजी चिकणी येथील 60 वर्षीय महिला व 13 ऑक्टोबररोजी विठ्ठलनगर (गुंजाळवाडी) परिसरातील 70 वर्षीय इसम अशा दोघांचा बळी घेतला. चालू महिन्यात कोविडचे संक्रमण होवून मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्याचा मृत्यू दर अवघा 1.02 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येतही रुग्ण बरे होण्याचे आणि संक्रमणात मृत्यू होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याने संगमनेरकर काहीसा सुखावला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत ३०६ नव्या रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता २ हजार ४०२ झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून ७६, खाजगी खासगी प्रयोगशाळेतून ८३ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून जिल्ह्यातील १४७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करुणा चाचणी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २४,अकोले ०१,जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा १०, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०३, शेवगाव ०१, श्रीरामपूर येथील ०४ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २८, अकोले ०६, जामखेड ०३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी १५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, लष्करी क्षेत्रातील ०१, मस्करी रुग्णालयातील ०४ रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज १४७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अमदनगर महापालिका क्षेत्रातील १२, अकोले ०६, जामखेड २२, कर्जत १०, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०७, पारनेर ०८, पाथर्डी १६, राहाता १९, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर येथील ०८ रुग्णांचा समावेश आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १२९, अकोले ३२, जामखेड ३०, कर्जत १७, कोपरगाव ११, नगर ग्रा. २०, नेवासा २३, पारनेर २२, पाथर्डी ६२, राहाता ३७, राहुरी २७, संगमनेर ८२, शेवगाव १४, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १८, लष्करी रुग्णालयातील सात जणांचा समावेश आहे.

- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ४९ हजार २३७..
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रूग्ण : २ हजार ४०२..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८०३..
- जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ५२ हजार ४४२..
- रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाण ९३.८९ टक्के..
- आज जिल्ह्यातील ५४९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०६ बाधितांची नव्याने भर..

